२४२ प्रवासी घेऊन जाणाऱ्या सौदीच्या विमानात बिघाड, लखनऊत उतरवले विमान!
16-Jun-2025
Total Views |
लखनऊ(Saudi Arabian Airlines): चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवार, दि. १५ जून रोजी, सकाळी सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या SV-3112 विमानाचे लँडिंग अतिशय भितीदायक परिस्थितीत झाले. विमानाच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघाल्याने विमानतळ प्रशासनाची ताराबंळ उडाली.विमानात २४२ हज यात्रेकरू उपस्थित होते, मात्र सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
विमान शनिवारी रात्री ११:३० वाजता जेद्दाहहून निघाले होते. रविवारी सकाळी ६:३० च्या सुमारास लखनऊमध्ये लँडिंग करताना, विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर टॅक्सी-वेवर येत असताना डाव्या चाकातून धूर व ठिणग्या दिसू लागल्या. पायलटने प्रसंगावधान राखत विमान तातडीने थांबवले आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरला (ATC) माहिती दिली.
त्यानंतर विमानतळ प्रशासनाने कोणताही विलंब न करता विमानतळावरील अग्निशमन दल तत्काळ दाखल केले,त्यांनी फोम व पाण्याचा मारा करत सुमारे २० मिनिटांत स्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर सर्व यात्रेकरूंना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
तांत्रिक बिघाडाचे कारण काय? प्राथमिक माहितीनुसार, ही समस्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये अचानक गळतीमुळे निर्माण झाली होती. यामुळे डाव्या चाकातील घर्षण वाढून धूर व ठिणग्या निघाल्या. ही समस्या टेकऑफच्या वेळी झाली असती, तर गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता होती, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
विमानतळ प्रशासनाने विमान मागे ढकलून टॅक्सी-वेवर नेण्यात आले. तांत्रिक तपासणीसाठी अभियंत्यांची टीम दिवसभर कार्यरत होती, परंतु संध्याकाळपर्यंतही पूर्ण समस्येचे निवारण झाले नव्हते. चौकशी अहवालानंतर अधिकृत कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
तसे पाहता सौदी अरेबियाचे एअरलाइन्सचे हे विमान हज यात्रेकरूसाठीच असते, परतीच्या प्रवासात जेद्दाहहून लखनऊला यात्रेकरूंना आणते, मात्र परत जाताना प्रवाशांशिवाय रिकामे परतते.