सुशांतसिंह राजपूतच्या पाचव्या पुण्यतिथीला बहिण श्वेता सिंह कीर्तीची भावनिक आठवण!

    14-Jun-2025   
Total Views |

emotional remembrance of sister shweta singh kirti on sushant singh rajput

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या अकस्मात निधनाला आज पाच वर्षे पूर्ण झाली. १४ जून २०२० रोजी मुंबईतील आपल्या घरात सुशांत मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकरणावरून संपूर्ण देश हादरला होता. आज त्याच्या पाचव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्याची बहिण श्वेता सिंह कीर्ती हिने एक भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या आठवणी जागविल्या.

श्वेताने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "आज भाईची पाचवी पुण्यतिथी आहे. १४ जून २०२० नंतर खूप काही घडलं. CBI ने कोर्टात रिपोर्ट सबमिट केला आहे आणि तो आम्ही मिळवण्याच्या प्रक्रियेत आहोत. पण आज मला एवढंच सांगायचं आहे. काहीही झालं तरी मनोबल ढासळू देऊ नका, देवावर आणि चांगुलपणावर विश्वास ठेवा. आपल्या सुशांतने जे जपलं निरागसतेने भरलेलं मन, ज्ञानाची ओढ, सगळ्यांशी समान वागणं आणि सतत मदतीसाठी तत्पर असणं तेच आपल्यालाही जपायचं आहे."

तिच्या व्हिडीओतही श्वेता अत्यंत भावूक होत म्हणाली की, "भाई कुठे गेलेला नाही. तो माझ्यात आहे, तुझ्यात आहे, आपल्यात सगळ्यांत आहे. जेव्हा आपण मनापासून प्रेम करतो, जेव्हा लहान मूलासारखा निरागस दृष्टिकोन बाळगतो, जेव्हा नव्याने शिकण्याची इच्छा बाळगतो तेव्हा आपण भाईला पुन्हा जिवंत करतो." तिने असेही आवाहन केले की, "कृपया भाईचं नाव कुठल्याही नकारात्मक गोष्टींसाठी वापरू नका. त्याला ते आवडणार नाही. त्याने नेहमी प्रेम आणि आशावाद यांचा प्रचार केला."

सुशांतच्या मृत्यूमागे आत्महत्या असल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त झाला होता. मात्र, त्यात खुनाचा संशयही अनेकांनी उपस्थित केला. त्यामुळे प्रकरणाची चौकशी CBI कडे सोपवण्यात आली. आता जवळपास पाच वर्षांनंतर CBI ने आपला रिपोर्ट सादर करत स्पष्ट केलं आहे की, कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा सापडलेला नाही आणि खुनाचे आरोप सिद्ध झालेले नाहीत.

श्वेता सिंह कीर्तीने शेवटी लिहिलं "आपण सर्वांनी मिळून सुशांतची आठवण फक्त दुःखात न ठेवता, त्याच्या विचारांना आणि मूल्यांना पुढे नेलं पाहिजे. आपणच ते दीप व्हावं जे इतरांना उजळवेल." आजही सुशांतसिंह राजपूतचं नाव ऐकताना लाखो चाहते भावूक होतात. त्याचा चेहरा, त्याची स्मितहास्य, त्याची धडपड आजही अनेकांच्या मनात जिवंत आहे.



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.