भयाचा मानसिक अंधारातला प्रवास : अंधार माया

    13-Jun-2025   
Total Views |

जेव्हा ‘भय’ ही एक मानवी भावना आपल्या मनाच्या खोल कप्प्यांत पसरत जाते, तिथून सुरू होते ‘अंधार माया’ची खरी कथा. ‘झी ५’वर नुकतीच प्रदर्शित झालेली ही मराठी वेबसीरिज पारंपरिक भुताखेतांच्या पलीकडची. ही मालिका भीती दाखवत नाही, तर ती हळूहळू मनात झिरपत राहते. कोकणाच्या हिरवाईत लपलेला एक वाडा, त्यात दडलेला भूतकाळ आणि त्या वाड्यात परतलेल्या नात्यांचे अनेक थर ही कथा जितकी गूढ आहे, तितकीच मानवी. ‘अंधार माया’ म्हणजे भयपट नव्हे, तर अंधार्या आठवणींनी झाकोळलेली एक अस्वस्थ मनयात्रा. मराठी वेबसीरिजच्या जगात ही एक थरारक, पण सूक्ष्म कलाकृती ठरते.

एक काळ असा होता, जेव्हा मराठी चित्रपटसृष्टी काहीशी साचेबद्ध होती. कुटुंबकेंद्री कथानकं, ग्रामीण संघर्ष किंवा सामाजिक प्रबोधनाची मांडणी हीच मुख्य रचना चित्रपटांच्या व मालिकांच्या केंद्रस्थानी दिसायची. त्याच त्या नातेसंबंधाच्या गुंतागुंती, हलयाफुलया विनोदाने सजलेली पारंपरिक वळणाची कथा आणि काहीशा ठरावीक शैलीतील भावनात्मकतेची पुनरावृत्ती यातून प्रेक्षक थोडा कंटाळलेलाही होता. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र झपाट्याने बदलताना दिसते. नवीन पिढीचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आता केवळ प्रेक्षकांना रडवण्यापुरतेच नव्हे, तर त्यांना गुंतवून ठेवणारे, विचारप्रवृत्त करणारे आणि थरार देणारे विषय हाताळू लागले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून ही झेप अधिक प्रभावीपणे समोर आली आहे. या माध्यमाने प्रायोगिकता, विविधतेला आणि शैलीगत प्रयोगांना मोठं व्यासपीठ दिलं आहे. याच प्रवाहात गेल्या काही दिवसांत ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ’अंधार माया’ ही भयप्रधान वेबसीरिज विशेष लक्ष वेधून घेते. मराठीत थरार आणि गूढता असलेल्या वेबसीरिज फारशा बघायला मिळत नाहीत, अशावेळी ’अंधार माया’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडते.

‘अंधार माया’ ही केवळ एका आत्म्याची गोष्ट नाही, तर ती मानवी मनाच्या गूढ कोपर्यांत डोकावणारी कथा आहे. यात भूतांच्या सावल्यांपेक्षा अधिक खोल आहे दुःख, पश्चात्ताप, अपूर्ण इच्छा आणि अंधार्या आठवणींनी व्यापलेलं आयुष्य.

‘अंधार माया’ची कथा कोकणातील एक दुर्गम, पण देखणं स्थान असलेल्या खाटू वाड्याभोवती फिरते. हा वाडा केवळ जुना नाही, तर त्याच्या भिंतीत आणि गाभार्यात काळाच्या अनेक छाया दडल्या आहेत. कथेला सुरुवात होते, जेव्हा खाटू कुटुंबाचे कर्ते पुरुष अचानक निधन पावतात. त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी सर्व घरची मंडळी या वाड्यात परत येतात. सुरुवातीला ही मालिका एक पारंपरिक, भावनिक आणि संस्कारप्रधान सर्जन वाटते. जुन्या आठवणी, नात्यांचे गुंते आणि दुःखाचा काळ. मात्र, जसजशी कथा पुढे सरकते, तसतसा वाड्याचा अंधार गडद होऊ लागतो. वाड्याच्या दगडी भिंती काहीतरी लपवत आहेत. असं काही जे डोळ्यांना दिसत नाही, पण प्रत्येक श्वासात जाणवतं. एकामागोमाग एक अपघात, विचित्र घटना आणि अनपेक्षित हालचाली सुरू होतात. घरातील सदस्य एकमेकांवर संशय घेऊ लागतात. संपत्तीचं वाटप, जुन्या वैराच्या ठिणग्या, आणि मनात दडलेली असुरक्षितता हे सगळं एका भयजन्य पातळीवर पोहोचतं. ही मालिका फक्त भूतांबद्दल नाही, तर माणसांमधल्या भूतकाळाबद्दल आहे. खाटू वाडा हा इथला एक पात्र बनतो तो फक्त वास्तू नाही, तर त्यात एक जिवंत भय आहे. आणि याच भयाने सगळ्या पात्रांना एका मानसिक अंधारात लोटून दिलं आहे.

या मालिकेतील सर्वांत ठळक आणि लक्षवेधी व्यक्तिरेखा म्हणजे गोण्या. खाटू वाड्याचा जुना सेवक. ही भूमिका प्रख्यात अभिनेते किशोर कदम यांनी साकारली आहे. त्यांचा आवाज, हालचाली आणि डोळ्यांतील भीती हे सगळं पाहताना गोण्याचं खर्याखुर्या वाड्याचा भाग वाटतो. एक अशी भूमिका जी बोलून फारसं सांगत नाही, पण सगळं सांगून जाते. ऋतुजा बागवे यांनी सायलीच्या भूमिकेतून एक सशक्त आणि संवेदनशील पात्र उभं केलं आहे. ती केवळ भीती व्यक्त करत नाही, तर कुटुंबातील गुंतागुंत, शंका आणि आत्मविश्वासही दाखवते. शुभंकर तावडे, स्वप्नाली पाटील, शुभांगी भुजबळ, अनुप बेलवलकर, ओमप्रकाश शिंदे, आणि पिहू गोसावी या कलाकारांनीही आपापल्या भूमिका तितयाच सशक्तपणे साकारल्या आहेत.

’अंधार माया’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन भिमराव मुडे यांनी केले असून, त्यांनी केवळ एक भयकथा सादर केली नाही, तर ‘भीती’ या भावनेला सूक्ष्म आणि मानवी स्वरूप दिलं आहे. त्यांनी अंधार हा केवळ दृश्यांमध्ये मर्यादित ठेवलेला नाही, तर तो मनाच्या गाभ्यात खोलवर झिरपतो. प्रेक्षकाला मनाच्या एका कोपर्यात खोल दडलेली अस्वस्थता जाणवते जी सहसा शब्दांत सांगता येत नाही, पण अनुभवता मात्र येते. वाड्याची छायाचित्रण शैली म्हणजे जणू एखादं जुनं दुःस्वप्न. वाड्यातील दरवाजे, कोपरे आणि कोरडे पडदे यामधून एक प्रकारचे दडपण प्रेक्षकांच्या मनावर सतत राहते. कपिल भोपटकर यांनी लिहिलेली पटकथा सुरुवातीला अतिशय शांत प्रवाहात पुढे जाते. पात्रांची ओळख, त्यांच्या मनोवृत्ती आणि पार्श्वभूमी यांची कसून मांडणी होत असतानाच, अचानक काही अनाकलनीय घटनांमुळे कथेला वेगळं वळण प्राप्त होतं. या वेबसीरिजचे खरं वैभव म्हणजे तिचं पार्श्वसंगीत. हे संगीत केवळ पार्श्वभूमीत वाजत नाही, तर ते दृश्यांमध्ये एक अतिरिक्त थर तयार करतं, जो भयाच्या अनुभूतीला गडद करतो. साधा पडदा हलतानाचा आवाज, पायर्यांवर उमटणारे मंद आवाज किंवा हळूवारपणे वाढणारी सुरावट हे सगळं इतकं नेमकं आणि परिणामकारक आहे की एखादं दृश्य केवळ त्याच्या ध्वनिसज्जतेमुळे मनावर कोरलं जातं. काही प्रसंगांमध्ये तर पार्श्वसंगीतामुळे संपूर्ण दृश्याचा अर्थच बदलतो, जे उत्तम दिग्दर्शन आणि उत्तम ध्वनिनिर्मिती यांचं उत्तम उदाहरण आहे.

’अंधार माया’ ही मालिका मराठी वेबाीरिजच्या वाटचालीत एक नवे वळण घेऊन येते. एक असं वळण, जे भयपटाच्या चौकटीपलीकडे जातं आणि मानवी मनाच्या खोल गर्भात डोकावतं. ही केवळ एक भूतांची, आत्म्यांची किंवा विचित्र घटनांची गोष्ट नाही, तर ती माणसाच्या आत दडलेल्या अधर्म, लोभ, असुरक्षितता आणि नात्यांमधील अपूर्णतेवर भाष्य करणारी एक मानसिक यात्रा आहे. इतका काळ मराठी कंटेंटमध्ये ‘भयपट’ ही एक हलकी आणि उपेक्षित शैली मानली जात होती. भय म्हणजे केवळ अंधार्या कोपर्यातून अचानक समोर येणारी छाया किंवा झटकन वाजलेला आवाज एवढ्यापुरता त्याचा विचार होत होता. पण, ’अंधार माया’ या मालिकेने ही पारंपरिक कल्पना पूर्णपणे मोडून टाकली आहे. ही मालिका थरारक आहे, पण ती केवळ थरारासाठी नाही, ती अंतर्मनाच्या गूढतेकडे बोट दाखवणारी, मानसिक गुंतागुंत उभी करणारी आणि गहिरा विचार करवणारी कलाकृती आहे. ही मालिका प्रेक्षकाला नुसती घाबरवत नाही, तर त्याच्या मनातले भय, पश्चात्ताप आणि जुन्या आठवणींचं अंधार वादळ जागं करते. ’अंधार माया’ ही मालिका मराठी सृष्टीसाठी केवळ एक वेबसीरिज नसून ती एक महत्त्वाची पायरी आहे चौकटीबाहेर विचार करण्याची, धाडसी विषय हाताळण्याची आणि शैलीमध्ये नवता आणण्याची!

दिग्दर्शक : भिमराव मुडे
लेखक : कपिल भोपटकर
कलाकार : किशोर कदम, ऋतुजा बागवे, शुंभकर तावडे

अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.