"आता थांबायचं नाही!" ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

    12-Jun-2025   
Total Views |

no need to wait anymore coming soon on ott
 
मुंबई : भावनिक आणि प्रेरणादायी अशा ''आता थांबायचं नाही!'' या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील श्रमिकांच्या संघर्षमय आणि स्फूर्तिदायक प्रवासावर आधारित असलेला हा चित्रपट सध्या IMDb वर ८.८ इतक्या उत्तम रेटिंगसह प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वैचळ यांनी केलं असून, त्यांनी याच चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. चित्रपटात भारत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष गोवारिकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

कथानक फिरतं एका मध्यमवयीन सफाई कामगार तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या आजूबाजूला, जे मुंबई महानगरपालिकेत वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या पदावर काम करत आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धात, शिक्षण घेण्याचा निर्णय घेतलेल्या या समूहाला एक प्रगतीशील अधिकारी प्रेरणा देतो आणि त्यांचं शालेय शिक्षण पुन्हा सुरू होतं. सुरुवातीला संकोचाने आणि संदेहाने भरलेला त्यांचा हा प्रवास, पुढे जाऊन स्वाभिमान आणि आत्मसन्मान शोधण्याचं ध्येय बनतो.

मुंबईच्या दुर्लक्षित वर्गावर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटात विनोद, हृदयस्पर्शी प्रसंग, आणि वास्तवाचं नातं मोठ्या ताकदीने गुंफलेलं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपली अस्मिता शोधणाऱ्या सामान्य कामगारांची ही कथा प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी आहे. "आता थांबायचं नाही" हया चित्रपटाचा प्रीमियर झी५ वर २८ जूनला प्रदर्शित करण्यात येणार आहे.  ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिलेला नाही, त्यांच्यासाठी ही एक संधी आहे. एक प्रेरणादायी अनुभव घरबसल्या पाहण्याची.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.