नाना, तुमचं मन आणि मेंदू भ्रष्ट झालाय! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून पटोलेंचा खरपूस समाचार
12-Jun-2025
Total Views |
मुंबई : तुमचं मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करतो, अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचा खरपूस समाचार घेतला. नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे असे संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केले आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणे म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाही, तर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की, नाही?" असा सवाल त्यांनी केला.
या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही!
"नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे. देशाच्या जवानांचे शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि भारत मातेच्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधीही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसने दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की, कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या. नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करीत आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.