मुंबई : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारताने बुधवारी ७ मे पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. या मिशनमध्ये जवळपास ८० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली आहे.
या कारवाईनंतर देशभरातून भारतीय लष्कराचे अभिनंदन होत आहे. राजकीय आणि लष्करी क्षेत्रासोबतच, बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या धाडसी पावलाला आपला पाठींबा दर्शवला.
अक्षय कुमार यांनी भारतीय लष्कराच्या अधिकृत पोस्टला शेअर करत लिहिले, “जय हिंद, जय महाकाल.” त्यांच्या या भावनिक प्रतिक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कंगना राणावत यांनी तर थेट इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हटले, “त्यांनी सांगितलं होतं मोदींना कळवा… आणि मोदींनी त्यांना कळवलं. #OperationSindoor. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत, “जे आपली रक्षा करतात, ईश्वर त्यांची रक्षा करो,” असे लिहिले.
सुनील शेट्टी यांनी “दहशतवादाला जागा नाही. शून्य सहनशीलता. पूर्ण न्याय,” असे म्हणत या कारवाईला पूर्ण पाठिंबा दिला.
ही कारवाई विशेषतः पंजाबच्या भवालपूर येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुख्य तळावर केंद्रित होती. सुरक्षा यंत्रणांनी अत्याधुनिक ड्रोन आणि सर्जिकल मिसाईल्सच्या सहाय्याने ही कारवाई अचूक पद्धतीने पार पाडली. या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून, काही राष्ट्रांनी भारताच्या आत्मरक्षणाच्या हक्काचे समर्थन केले, तर काहींनी दोन्ही देशांनी संयम बाळगावा, असे आवाहन केले आहे.
देशात मात्र एकात्मतेचे आणि लष्करावरील अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक सोशल मीडियावर “जय हिंद”, “ऑपरेशन सिंदूर झिंदाबाद” अशा घोषणा देत आहेत. या यशस्वी कारवाईमुळे भारताने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले की, देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.