नवी दिल्ली : (Pakistan Spy Qasim Arrested from Rajasthan) पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी करणाऱ्यांविरोधात शोधमोहिम सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अनेकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थानमधील भरतपूर येथून एका ३४ वर्षीय पाकिस्तानी गुप्तहेर मोहम्मद कासिम याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासिम नावाचा हा व्यक्ती पाकिस्तानच्या आयएसआयसाठी काम करत होता. राजस्थानातील डीग जिल्ह्यातील गंगोरा गावचा तो रहिवासी आहे. याआधी तो दिल्लीतही राहिला आहे. हेरगिरीच्या कारवायांसाठी भारतीय मोबाईल सिम कार्ड पुरवून आयएसआयला मदत केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी कासीमला अटक केली आहे. तपासात असे समोर आले आहे की, कासिमची आत्या पाकिस्तानात राहते. तो ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये पाकिस्तानला गेला होता. यादरम्यान तो तब्बल ९० दिवस पाकिस्तानात राहिला होता. त्या ठिकाणी आयएसआयच्या एजंटची त्याने त्या काळात भेट घेतली होती.
The Delhi Police has arrested a man from Rajasthan for aiding Pakistani Intelligence Operatives by supplying Indian mobile SIM cards for espionage activities. Kasim (34) travelled to Pakistan twice - first in August 2024 and again in March 2025 and stayed there for about 90 days. pic.twitter.com/NJuu3HDXKp
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सांगितले की, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा (पीआयओ) व्हॉट्सअॅपद्वारे भारतीय सिम कार्ड वापरत होते. या भारतीय नंबरचा वापर ते व्हॉट्सअॅपद्वारे भारतीयांशी संपर्क साधण्यासाठी, सैन्य आणि इतर सरकारी कार्यालयांशी संबंधित संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी करत होते. भारताच्या तपास यंत्रणा पीआयओ आणि त्यांच्या भारतातील सहकाऱ्यांनी रचलेल्या संपूर्ण हेरगिरीच्या कटाचा उलगडा करण्यासाठी पुढील तपास करत आहेत.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\