शाश्वत ‘सत्या’चा ध्येयव्रती...

    29-May-2025
Total Views |
शाश्वत ‘सत्या’चा ध्येयव्रती...

सार्वजनिक स्वच्छता, त्याविषयीची जनजागृती याविषयी व्यापक मोहिमा राबवून पर्यावरणाच्या शाश्वततेचे व्रत घेतलेल्या पुण्यातील सत्या नटराजन यांच्याविषयी...

शनिवार-रविवार म्हटले की, आठवडाभर काम करून थकलेल्या आपल्या सर्वांचा कल हा विरंगुळा, मनोरंजन किंवा चक्क विश्रांती घेण्याकडे असतो. काही जण सहलीला जातात, आरोग्याबाबत जागरूक असलेले ट्रेकिंग, सायकलिंग करतात, तर काही जण मॉल्स आणि हॉटेल्समध्ये आपल्या साप्ताहिक सुट्टीचा आस्वाद लुटतात. पण, पुण्यातील एक व्यावसायिक गेली कित्येक वर्षे चक्क शनिवारी आणि रविवारी कचरा उचलणे व पर्यावरण संवर्धनाची जागरूकता निर्माण करण्यात व्यस्त आहे.

मूळचे तामिळनाडू येथील सत्या नटराजन हे आयटी अभियंता असून, कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले. समाजकार्याची आवड त्यांना विद्यार्थीदशेतच निर्माण झाली. इयत्ता सातवीत असताना आपल्या शाळेच्या इमारतीची डागडुजी करण्यासाठी निधी उभारणे असो किंवा महाविद्यालयामध्ये ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांबरोबर विहीर साफ करणे, असो हे दोन्ही सुरुवातीचे टप्पे होते. पुण्यात आल्यावर एका आयटी कंपनीत नोकरी मिळाली. पण, हे काम नाईट शिफ्टचे होते. घरी आल्यावर दिवसभर जेमतेम चार ते पाच तास झोप लागायची आणि त्यानंतर करायचे काय, हा प्रश्न त्यांना पडला. सत्या हे आपल्या आवडत्या कामाकडे वळत गेले, ते म्हणजे पर्यावरण जागरूकता. सुरुवातीला स्वतःच काही ठिकाणे साफ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुठलीही गोष्ट व्यापक प्रमाणावर करायची असेल, तर संघटनांशी जोडले जाणे हे महत्त्वाचे असते. त्यांनी विविध सामाजिक संस्थांबरोबर आपले कार्य सुरू केले. शनिवार-रविवार अगदी सकाळी ७ वाजल्यापासून विविध स्वच्छता अभियानांमध्ये भाग घेणे सुरू केले. मग ते रस्ता साफ करणे, नदीपात्र असो किंवा ऐतिहासिक स्थळांच्या आजूबाजूची सफाई असो. सर्व ठिकाणी सत्या हे आवर्जून दिसतात. आपल्या व्यवसायात आत्मसात केलेले संभाषण, नेतृत्व कौशल्य, पर्यावरणाबाबत असलेले ज्ञान आणि आवड यांमुळे कालांतराने अशा स्वच्छता उपक्रमांचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. आज सत्या तब्बल ६० हून अधिक स्वयंसेवी संस्थांशी जोडले गेले आहेत.


त्यांचे व्यापक कार्य लक्षात घेता, त्यांना २००३ साली पुणे महानगरपालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण अ‍ॅम्बेसिडर’ म्हणूनही नियुक्त केले. याचबरोबर ‘अदर पुनावाला लीन सिटी इनिशिएटिव्ह’ या सुका कचरा संकलन आणि जागरूकता पुढाकारामध्येदेखील त्यांना ‘लीड वॉलेंटिअर’ म्हणून जबाबदारी सोपविली गेली. या माध्यमातून वर्षातील ५२ आठवड्यांमध्ये प्रत्येक शनिवार किंवा रविवारी विविध स्वयंसेवी संस्थांबरोबर स्वच्छता मोहीम राबविण्यात मदत करत आहेत. त्यांचे कार्य फक्त साफसफाईपुरते मर्यादित नाही, तर त्याविषयीची जागरूकता निर्माण करणे आणि भविष्यातील नेतृत्व निर्माण करणे, हेदेखील आहे.


आज सत्या अनेक तरुणांबरोबर अशा मोहिमा राबवत त्यांच्यातील नेतृत्व तयार करून, एकप्रकारे शाश्वततेचे मोलाचे काम करत आहेत. स्वच्छता हे मोठे आणि व्यापक कार्य असले, तरी सत्या नटराजन यांचे काम आणि दृष्टिकोन हे बहुआयामी असे. पर्यावरणाच्या विविध समस्यांवर कशाप्रकारे मात करता येईल, यासाठी सत्या सदैव प्रयत्नशील असतात. उदाहरणच द्यायचे झाले, तर आपल्या डिजिटल साधनांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे ‘अर्बन ट्री अ‍ॅट’ हे साध्या सोप्या भाषेत आणि अगदी थोडयात सर्वसामान्यांना समजेल असे सर्वांसमोर मांडले आहे. आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे, प्लास्टिक व ई-कचर्‍याच्या समस्यांबाबत सातत्याने जागरूकता मोहिमा ते राबवत आले आहेत. सध्या पुण्यामध्ये वर्षभर मॅरेथॉन आयोजित केल्या जातात व त्यात शेकडो, हजारो लोकं भाग घेतात. त्यानंतर निर्माण होणारा कचरा साफ करून प्रत्येक मॅरेथॉन ही कचराशून्य उपक्रम झाली पाहिजे, यासाठी ‘सस्टेनेबल मॅरेथॉन्स’ या ‘अदर पूनावाला लीन सिटी इनिशिएटिव्ह’च्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतात. त्यांचा एक आवडता व सर्वांत व्यापक उपक्रम म्हणजे, ‘माझी वारी, स्वच्छ वारी.’ दरवर्षी पंढरपूरला जाणारे लाखो भाविक हे पुण्यातून जातात. पालख्या मार्गस्थ झाल्यानंतर पुण्यातील ग्रामीण भागातील तब्बल १२० किमीचा टप्पा अवघ्या काही तासांतच साफ करणार्‍या या उपक्रमामध्ये सत्या नटराजन हे सक्रियपणे सहभाग घेतात.


कचरामुक्त शहरांसाठी शहरांतर्गत असलेल्या ‘इंडियन स्वच्छता लीग’मध्ये ते ‘कॅप्टन पुणेरी नायक’ म्हणूनही ते शहराचे प्रतिनिधित्व करत आहेत. महामारीच्या काळातदेखील ते स्वस्थ बसले नाहीत. रोज हजारो फूड पॅकेट्सचे वाटप करणे, आपत्कालीन सेवाकार्यात, स्मशानभूमीमध्ये मदत करणे अशी अनेक कामे त्यांनी केली. कचर्‍याच्या संदर्भात फक्त जागृतीच नव्हे, तर ते स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील शाश्वततेची ‘३ आर’ (रिड्युस, रियुज व रिसायकल) प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या आजोबांकडून मिळालेली सायकल ते अजूनही वापरत असून, सायकलचे वय हे त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आपल्या करिअरच्या शिखरावर असतानादेखील बहुतांशवेळी ते सार्वजनिक वाहतूक म्हणजेच ‘पीएमपीएमएल’ने प्रवास करतात. एकीकडे आपल्या यशाचे जीवनशैली मापदंड मानले जात असताना, त्यांचा हा प्रयत्न प्रेरणादायी आहे. अशी त्यांच्याबाबत अनेक उदाहरणे असून खरोखरच त्यांनी शाश्वततेची मूल्ये आत्मसात केल्याचे दिसून येते.


सत्या नटराजन यांचा हा प्रवास म्हणजे, एखाद्-दुसर्‍या उपक्रमांच्या माध्यमातून समाजकार्य नव्हे, तर वर्षानुवर्षेे केलेल्या समर्पणाने, सामुदायिक भावनेने आणि सकारात्मक बदलासाठीच्या अढळ वचनबद्धतेने विणलेली एक कलाकृती आहे. आपल्या आजीकडून सेवेची भावना आत्मसात केल्यामुळे, सत्या नटराजन यांच्या या सामाजिक कार्याचा प्रवास हा असाच निरंतर सुरू राहील आणि पुढील पिढीला प्रेरणादेखील देत राहील, यात शंका नाही. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांच्या या कार्यास शुभेच्छा!



अतुल तांदळीकर
 ९८२३०१०७५३