मुंबई : सुप्रिया सुळेंना सत्तेची तहान लागली असेल पण तहान लागल्यावर कुणी गटारातले गढूळ पाणी पीत नाही, असे विधान उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असून मविआत काही आलबेल नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सुप्रिया सुळे किंवा अन्य काही नेत्यांची नाव तुम्ही वारंवार घेत आहात. त्यांना नक्कीच सत्तेची तहान लागली असेल. पण तहान लागल्यावर कुणी गटारातले गढूळ पाणी पीत नाही. तहान जरी लागली असेल तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचे म्हटले तरी त्या महासागरात इतक्या लाटा उसळल्या आहेत, इतकी गर्दी आहे की, प्रत्येकाला आपले स्थान शोधावे लागेल. जे गेलेले आहेत, तेच धडपडतायच तिथे अस्तित्वासाठी, नवी जाऊन काय करणार," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण मला जे ज्ञान आहे त्यानुसार शरद पवार हे भाजपसोबत जाणार नाहीत. पवार साहेबांनी राजकारणामध्ये खूप मोठी पारी खेळली आहे. आता ते प्रत्यक्ष मैदानावर नसले तरी कोचिंगच्या भूमिकेत आहेत. मी त्यांना ओळखतो, त्यांची विचारधारा आणि भूमिका मला माहीत आहे. त्यांचे वय आता ८५ वर्षे आहे. पण अशा नेत्यांना काम करताना वयाचे बंधन नसते. शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या भूमिका आणि विचारधारा पाहिल्यास ते भाजपसोबत कधीच जाणार नाही, असा माझा विश्वास आहे," असेही संजय राऊत म्हणाले.