"कन्नड भाषेला तमिळ भाषेने जन्म दिला" जेष्ठ अभिनेते कमल हसनच्या विधानावरून मोठा वाद!

    28-May-2025   
Total Views |


big controversy over veteran actor kamal haasan


मुंबई : चेन्नईमध्ये झालेला आगामी चित्रपट 'थग लाइफ' च्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात दिलेल्या विधानामुळे दिग्गज अभिनेते आणि राजकारणी कमल हसन सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. ''तमिळ भाषेने कन्नड भाषेला जन्म दिला'' असे विधान करत त्यांनी जे म्हंटले, त्याचा अर्थ सांस्कृतिक ऐक्य निर्माण करण्याच्या हेतूने घेतला गेला असावा, मात्र ते विधान कर्नाटकमध्ये प्रचंड रोषाला सामोरे गेले आहे.


कार्यक्रमादरम्यान कमल हसन यांनी आपल्या भाषणाची सुरुवात "Uyire Urave Tamizhe" म्हणजेच “माझं जीवन आणि माझं कुटुंब तमिळच आहे” या भावनिक घोषणेतून केली. यानंतर ते मंचावर उपस्थित असलेल्या कन्नड अभिनेता शिवराजकुमारकडे वळाले आणि प्रेमळ सुरात म्हणाले, ''शिवराजकुमार माझं कुटुंबच आहे, पण दुसऱ्या राज्यात राहतं... तुमची भाषा तमिळमधूनच जन्माला आली आहे. त्यामुळे तुम्हीही त्या परंपरेचा भाग आहात.''


हसन यांचे हे विधान कदाचित एकता आणि सांस्कृतिक संबंध दर्शवण्यासाठी केले गेले होते. मात्र, त्याचे पडसाद फारच वेगळ्या प्रकारे उमटले. काही तासांतच, कर्नाटकमधील प्रखर प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या संघटना आणि राजकीय नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.


कर्नाटकमधील तीव्र प्रतिक्रिया
कर्नाटका रक्षण वेदिके (KRV) या प्रखर कन्नड समर्थक संघटनेने हसन यांच्या विधानावर जोरदार टीका केली. त्यांच्या (प्रवीण शेट्टी गटाच्या) अध्यक्ष प्रवीण शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ''कमल हसन यांनी कन्नड भाषेचा अपमान केला आहे. तुम्ही येथे व्यवसाय करायचा, चित्रपट प्रदर्शित करायचे, आणि आमच्या भाषेला डावलायचं? हे आम्ही खपवून घेणार नाही.''


त्यांनी पुढे सांगितले की, “हसन कार्यक्रमातून आमच्यापूर्वीच निघून गेले. अन्यथा आम्ही त्यांचं तोंड काळं केलं असतं. हा शेवटचा इशारा आहे. कर्नाटकमध्ये जर तुम्हाला चित्रपट प्रदर्शित करायचे असतील, तर कन्नड आणि कन्नडिगांचा सन्मान राखावा लागेल.”

भाजपकडून तीव्र शब्दात निषेध
कर्नाटक भाजप अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी कमल हसन यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत म्हटले, ''त्यांनी तमिळ भाषेला गौरव देताना कन्नड भाषेचा अपमान केला आहे. अशा विधानांनी ६.५ कोटी कन्नडिगांचा आत्मसन्मान दुखावला गेला आहे. हसन यांनी तात्काळ आणि बिनशर्त माफी मागावी.''

विजयेंद्र यांनी हसन यांच्यावर यापूर्वीही हिंदू धर्म आणि धार्मिक भावना दुखावण्याचे आरोप लावले. ''दक्षिण भारतात ऐक्य निर्माण करण्याची भाषा करणारे कमल हसन सतत हिंदू धर्माची टिंगल करत आहेत. आता ते भाषिक अस्मितेवरही घाला घालत आहेत,'' असे ते म्हणाले.

भाजप नेते आर. अशोक यांनी तर थेट हसन यांना “मानसिक रुग्ण” असे संबोधले. त्यांनी राज्य सरकारला आवाहन केले की, ''कमल हसन यांच्या सर्व चित्रपटांना कर्नाटकमध्ये बंदी घालावी. अन्यथा ते अशाच प्रकारची वक्तव्य करत राहतील.''

काँग्रेसही मैदानात उतरली
भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही या प्रकरणात कमल हसन यांची निंदा केली. काँग्रेस प्रवक्त्यांनी सांगितले की, ''हसन हे कलाकार असतील, पण त्यांना भाषेचा इतिहास सांगण्याचा अधिकार नाही. अशा असंवेदनशील विधानांमुळे प्रादेशिक भावनांना ठेच पोहोचते आणि समाजात तणाव निर्माण होतो.''


दक्षिणेतील भाषिक अस्मिता आणि त्यातील नाजूकतेचा प्रश्न
दक्षिण भारतात भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ओळखीचा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू या सर्व भाषांचा प्राचीन इतिहास असून त्यांच्या समकालीनतेवर विद्वानांमध्ये आजही चर्चा सुरू असते. अशा पार्श्वभूमीवर, ज्या वाक्यांचा हेतू ऐक्य आणि मैत्री दाखवण्याचा असतो, त्याच वाक्यांचे काही वेळा चुकून चुकीचे अर्थ लावले जातात आणि त्यातून वाद निर्माण होतात.


कमल हसन यांची प्रतिक्रिया प्रतीक्षेत
सध्या कमल हसन यांनी या वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया लवकरच अपेक्षित आहेत.



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.