मुंबई : मराठी आणि हिंदी रंगभूमी, चित्रपट तसेच मालिकांमधील आपल्या बहुआयामी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशोक सराफ यांना अखेर राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या या सन्मानाने केवळ सराफ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानाची आणि आनंदाची भावना अनुभवायला मिळाली आहे.
२७ मे रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेल्या भव्य समारंभात अशोक सराफ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. एकूण 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले, आणि अशोक सराफ हे त्या यादीतील झळाळते नाव ठरले.
या प्रसंगी अशोक सराफ यांनी मुलाखतीत आपल्या मनोगतामध्ये अत्यंत नम्रपणे सांगितले, "ही एक फार मोठी गोष्ट आहे. असा सन्मान मिळणं म्हणजे खूप काही. म्हणजे मी आयुष्यात काहीतरी केलंय असं त्यांना वाटलं, हेच खूप आहे." पुरस्कार उशिरा मिळाला का, या प्रश्नावर त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, "विलंब झाला असं मी म्हणणार नाही. विसरले असते, तर कदाचित काही बोललो असतो. पण त्यांनी लक्षात ठेवले, हेच माझ्यासाठी मोठं आहे."
या भावनिक क्षणी त्यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ देखील उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं, "हा सन्मान खूप आधी मिळायला हवा होता. पण शेवटी मिळाला, हीच मोठी गोष्ट आहे. त्यांच्या वाटचालीतील हा क्षण माझ्यासाठी देखील अविस्मरणीय आहे." त्यांच्या नजरेतून त्या काळातील संघर्ष, मेहनत आणि प्रेक्षकांचे अपार प्रेम स्पष्ट जाणवत होते.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांनी लिहिलं, "पद्मश्री हा सन्मान माझ्या आयुष्यातील एक विशेष क्षण आहे. महाराष्ट्र शासनाचे, माझ्या कुटुंबाचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं." हा पुरस्कार त्यांच्या आयुष्यातील केवळ एक सन्मान नसून, मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्राने त्यांच्या योगदानाची घेतलेली दखल आहे. 'अश्रूंची झाली फुले', 'हम पंच', 'यह जो है जिंदगी', 'अंधार एक मी हि एक', 'गंमत-जंमत', 'सखाराम बाईंडर', 'अशी ही बनवाबनवी' यांसारख्या चित्रपटांमधून आणि नाटकांतून त्यांनी आपल्या विनोदी, गंभीर, भावनिक अशा सर्व भूमिका अविस्मरणीय केल्या आहेत.
हा सन्मान म्हणजे अशोक सराफ यांच्या तपश्चर्येचा पुरस्कार आहे. त्यांच्या अभिनयातला सहजपणा, संवादफेक, आणि 'टाइमिंग' ही त्यांच्या लोकप्रियतेची गुपितं आहेत. याच माध्यमातून त्यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केलं आणि आजही ते त्यांच्या मनात तेवढ्याच प्रेमाने व आदराने वसलेले आहेत.
पद्मश्रीचा हा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या आणि भारतीय सिनेमाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा क्षण आहे ज्यात कलाकाराच्या परिश्रमांना, कलेच्या निष्ठेला आणि प्रेक्षकांच्या प्रेमाला योग्य तो न्याय मिळाला आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.