मुंबई : सिनेविश्वातील मानाच्या समजल्या जाणार्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नानाविध चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळत असते. विविध राष्ट्रीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या वेरा फिल्म्सच्या 'ऊत' या मराठी चित्रपटाचे स्क्रीनिंग नुकतेच कान्स महोत्सवात संपन्न झाले.
मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल,श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या सारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे. त्यानंतर आता 'कान्स' सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात ‘ऊत’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राम मलिक दिग्दर्शित या चित्रपटातून राज मिसाळ आणि आर्या सावे हे युवा कलाकार भेटीला आले आहेत.
कान्स सारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवात चित्रपटाचे स्क्रीनिंग आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणे ही आमच्या चित्रपटाच्या टीमसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे चित्रपटाचे मुख्य अभिनेते राज मिसाळ यांनी सांगितले. समाजापर्यंत चांगला दृष्टिकोन पोहोचवण्याचा केलेल्या प्रयत्नाचं हे यश आहे, अशी भावना त्यांनी या स्क्रीनिंग नंतर व्यक्त केली. 'ऊत' चित्रपटातून एक ज्वलंत सामाजिक विषय मांडण्यात आला असून लवकरच हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.