प्रेमाच्या गोडसर लहरींनी भरलेलं, शशिकांत धोत्रे निर्मित 'सजना' चित्रपटाचं, एक कोवळं प्रेमगीत "झोका" प्रदर्शित !!

    27-May-2025   
Total Views |

a tender love song zhoka from the film sajana produced by shashikant dhotre filled with sweet waves of love, has been released

मुंबई : प्रेम कधी शब्दांत नाही मावत, ते डोळ्यांत दिसतं, हसण्यात मिसळतं आणि शांततेत गुंजतं. दोन मनं एकत्र येत असताना त्यांच्यातली नाजूकशी चाल, हेच त्या प्रेमाचं खरं संगीत असतं. याच भावनेला स्वरबद्ध करत शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटाचं एक हळवं गीत "झोका" आता प्रदर्शित झालंय.

 
प्रेक्षकांच्या हृदयात ठसा उमटवण्यासाठी सज्ज असलेलं "झोका" हे नवीन मराठी रोमान्टिक गाणं भुंगा म्युझिकच्या बॅनरखाली प्रदर्शित झालं आहे. सूर्यमुखी फुलांच्या सोनसळी शेतात आणि पाण्याखालच्या अद्भुत दृश्यांमध्ये चित्रीत झालेलं हे गाणं प्रेमाच्या कोवळ्या भावना आणि नाजूक क्षणांची प्रभावी पद्धतीने मांडणी करतं.

 
"झोका" हे गाणं निसर्गाच्या साक्षीने उलगडणाऱ्या एका प्रेमकथेचे सुंदर चित्रीकरण आहे. प्रेमाच्या आठवणींना जागवणारे शब्द आणि सोपं पण सुंदर संगीत या गाण्याची खासियत आहे. गायक-गायिकेचा आवाज आणि त्यांच्या भावना आपल्याला प्रेमातली ती पहिली झोक्याची क्षणं आठवायला लावतात. मराठीत अशा प्रकारचं दृश्य आणि भावनिक सादरीकरण खरंच कौतुकास्पद आहे. हे गाणं नव्या पिढीच्या प्रेमकथेचं एक सुंदर दर्शन घडवतं.

 
ह्या गाण्याचे गायक राजेश्वरी पवार आणि ओंकारस्वरूप हे आहेत. तर संगीतकार सुद्धा ओंकारस्वरूप आहे, गीतकार हे सुहास मुंडे आहेत. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. प्रेमाच्या वेगवेगळ्या रंगांनी भरलेला "सजना" हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात २७ जून २०२५ पासून प्रदर्शित होणार आहे.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.