अक्वा लाईन जलभराव प्रकरण – जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

    26-May-2025
Total Views |
Mumbai Aqua line Metro filled with water
मुंबई : मुंबई मेट्रो लाईन ३ (अक्वा लाईन) च्या आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्टेशन परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या जलभरावामुळे मेट्रो सेवा तात्पुरती थांबवण्यात आली होती. या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला असून सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी MMRC (मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.) कडे संबंधित अधिकाऱ्यांची व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार “बांधकामाच्या वेळी मुसळधार पावसाचा विचार करून योग्य जलनिकासी व्यवस्था केली गेली असती, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पावसाचे पाणी थेट स्टेशनमध्ये शिरणे हे जलप्रतिबंधक उपाय अपुरे असल्याचे निदर्शक आहे. उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांतच सेवा ठप्प होणे ही देखभाल व नियोजनातील गंभीर त्रुटी आहे.”
या प्रकारामुळे मेट्रो प्रकल्पातील गुणवत्ता नियंत्रण, देखभाल नियोजन आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि कंत्राटदारांकडून नुकसानभरपाई घेण्यात यावी, अशी मागणी श्री. गलगली यांनी केली आहे.