स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायूतीतच! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा
24-May-2025
Total Views |
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायूतीतच लढायच्या ही भाजपची भूमिका आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शनिवार, २४ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "प्रफुल्ल पटेल आणि धर्मरावबाबा आत्राम काय बोलले याबद्दल मला माहिती नाही. पण येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्येच लढायच्या ही भाजपची भूमिका आहे. निवडणूका घोषित झाल्यानंतर आम्ही बसणार असून मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व निवडणुका महायूतीमध्ये लढणार आहोत. स्थानिक पातळीवर वेगळे लढण्याची काही चर्चा होत आहे. पण आम्ही एकत्र लढू हाच महायूतीचा निर्णय आहे," असे ते म्हणाले.
धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, "महायूतीत सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले असून २८८ आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले. धर्मरावबाबा आत्राम यांना निवडून आणण्यासाठी मी स्वत: दोन बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे आता टीकाटिपण्णी किंवा आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाहीत तर १४ कोटी जनतेला न्याय देण्याचे दिवस आहेत."
राहुल गांधी अभ्यास करत नाहीत!
"राहुल गांधी यांना काहीही समजत नाही. ते अभ्यास करत नाहीत. त्यांना शिकण्याची सवय नाही. त्यांना समजत नसेल तर त्यांनी शिकून घ्यावे. राहुल गांधी देशाला समजू शकले नाहीत. ते वर्षातून दोन दोन महिने विदेशात राहतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परराष्ट्र धोरण शिकवतात. दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी मोदीजी संपूर्ण जगाला सोबत आणत असून हेच त्यांचे परराष्ट्र धोरण आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.