ज्येष्ठत्वातून श्रेष्ठत्वाकडे...

    23-May-2025
Total Views |
 
Vrushali Maral who works through the Pimpri-Chinchwad Senior Citizens Federation
 
समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या विकासासाठी ‘पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघा’च्या माध्यामातून कार्यरत असलेल्या वृषाली मरळ यांच्याविषयी...
 
असे म्हणतात की, वयाने साठी ओलांडलेल्या माणसांना ‘म्हातारे’ म्हणू नका, तर ‘ज्येष्ठ’ म्हणा. त्याचे कारण म्हणजे, ‘म्हातार्‍यांना’ इतरांचा आधार लागतो आणि ‘ज्येष्ठ’ इतरांना आधार देण्याचे काम करतात! ज्येष्ठ नागरिकांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या विकासासाठी ज्या संस्था अथवा व्यक्ती सातत्याने प्रयत्नशील असतात, त्यांपैकी एक नाव म्हणजे वृषाली मोतीराम मरळ. पिंपरी-चिंचवड येथील ‘ज्येष्ठ नागरिक महासंघा’च्या अध्यक्षपदी सध्या त्या कार्यरत असून, या महासंघाच्या माध्यमातून वृषाली ज्येष्ठांच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. साधारणपणे गेल्या दोन दशकांपूर्वी ‘पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघा’ची स्थापना करण्यात आली. तब्बल 20-21 वर्षांनंतर वृषाली मरळ यांच्या रूपाने या महासंघाला पहिल्यांदा महिला अध्यक्ष लाभल्या आहेत.
 
महासंघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वृषाली या जोमाने कामाला लागल्या. आपल्या कारकिर्दीत ज्येष्ठ नागरिकांना हक्काची जागा म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ‘ज्येष्ठ नागरिक महासंघ’ भवन उभारण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.केवळ आणिकेवळ ज्येष्ठ नागरिकांच्या उन्नतीसाठी झटणार्‍या वृषाली यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातला. लहानपणापासूनच मोठ्या कुटुंबात पालनपोषण झालेल्या वृषाली यांच्यावर त्यांच्या आईवडिलांनी शिक्षणाचे उत्तम संस्कार केले. पिंपळगाव माळवी या छोट्याशा गावातील श्रीराम विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे ‘डीएड’ करून त्यांनी चिंचवड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. नोकरीमध्ये त्यांचे फारसे मन रमले नाही. काही वर्षांनंतर नोकरी सोडून त्यांनी खासगी क्लासेस घ्यायला सुरुवात केली. अनेक गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत विद्यादान करत सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. याकामी वृषाली यांना त्यांचे पती मोतीराम मरळ यांचे मोठे सहकार्य लाभले आणि प्रेरणा मिळाली.
 
पतीच्या निधनानंतर त्यांनी खचून न जाता, पती विरहाच्या दुःखाला सामोरे जात समाजकार्यासाठी स्वतःला झोकून दिले. त्यासाठी निमित्त ठरले थेरगाव येथील ‘ज्येष्ठ नागरिक संघ.’ 12 वर्षांपूर्वी वृषाली थेरगावच्या ‘ज्येष्ठ नागरिक संघा’त सदस्य म्हणून दाखल झाल्या. त्यानंतर त्यांची ‘पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघा’वर सहसचिव या पदावर निवड झाली. सहसरचिटणीस, कार्याध्यक्षपदी कार्य करून त्या आता अध्यक्षपदी विराजमान आहेत. महासंघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या कार्यकाळात मनपातर्फे पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश ज्येष्ठ नागरिक संघांना विविध उपक्रम राबविण्यासाठी मनपातर्फे टिव्ही, 50 खुर्च्या, एक टेबल मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. गेल्या वर्षी 135 संघांना हार्मोनियम, तबला, 15 टाळ आणि दोन सतरंज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्याची त्यांनी व्यवस्था केली. यंदा पुन्हा एकदा 50 खुर्च्या तसेच, पाच फूट उंचीच्या समईची त्यांनी मनपाकडे मागणी केली आहे.
 
दरवर्षी दि. 1 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ साजरा करताना महासंघाच्यावतीने ज्येष्ठांसाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. तसेच महिला दिनसुद्धा उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येतो. याव्यतिरिक्त वृक्षारोपण, ज्येष्ठांमध्ये मतदानाबाबत जाणीवजागृती, स्वच्छता अभियानात सहभाग, ज्येष्ठांचे वाढदिवस, भारतीय संस्कृतीतील सण-समारंभ साजरे करणे यांसाठी त्या नेहमीच पुढाकार घेत असतात. यासाठी आपल्याला महासंघाच्या सर्व पदाधिकार्‍यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे वृषाली यांनी आवर्जून सांगितले. दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात विकसित होत चाललेल्या पिंपरी-चिंचवड या जोड शहरांमध्ये विविध भागांत ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन जे ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ स्थापन केले आहेत, त्यांची आजघडीला नोंदणीकृत संख्या 158 आहे, तर या संघाची 32 हजारांहून अधिक सदस्यसंख्या आहे. या सर्व संघांमध्ये समन्वय साधण्याचे काम वृषाली यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेला ‘ज्येष्ठ नागरिक महासंघ’,पिंपरी-चिंचवड’ करीत आहे.
 
महासंघाच्या कामाची व्याप्ती आणि विविध उपक्रमांचे वर्षभरातील आयोजन लक्षात घेता, चिंचवड येथे मनपातर्फे भव्य स्वरूपात ज्येष्ठ नागरिक भवन बांधून देण्याबाबत वृषाली यांनी जो पाठपुरावा केला, त्याबाबत मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. ‘ज्येष्ठ नागरिक महासंघ भवन’साठी चिंचवड स्थानकाजवळ नऊ गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती वृषाली यांनी दिली. या जागेवर पाच मजली इमारत उभी राहणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा, महासंघाच्या कामकाजासाठी कार्यालय, प्रतिनिधी परिषदेच्या बैठकीसाठी हॉल, ज्येष्ठांना करमणुकीचे खेळ खेळण्यासाठी जागा, तसेच पार्किंग, लिफ्ट आदी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
 
याकामी आयुक्त शेखर सिंह यांच्याप्रमाणे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, साहाय्यक आयुक्त (समाज विकास विभाग) तानाजी नरळे, स्थापत्य अभियंता निकम यांचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याची माहिती ‘ज्येष्ठ नागरिक महासंघा’च्या अध्यक्षा वृषाली मरळ यांनी दिली. त्यांच्या आजपर्यंतच्या या कार्याची दखल घेत, ‘पिंपरी-चिंचवड मराठा मंडळा’च्यावतीने ‘मराठा भूषण,’ महानगरपालिकेच्यावतीने ‘आदर्श कर्तृत्ववान महिला’, भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील आणि खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आधार तसेच ‘सोहम वाचनालया’तर्फे मानपत्र देऊन वृषाली यांना सन्मानित करण्यात आले आहे. ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम हाती घेऊन त्यांच्या आनंदात समाधान शोधणार्‍या वृषाली यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
- अतुल तांदळीकर