पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. शुक्रवार, २३ मे रोजी त्यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली.
त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या प्रकरणाशी संबंधित महिला आयोगाने केलेल्या कारवाईबद्दलची सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "६ नोव्हेंबर २०२४ ला करीश्मा हगवणे यांनी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी राज्य महिला आयोगाला तक्रारीचा मेल केला होता. हा मेल आल्यानंतर राज्य महिला आयोगाने संबंधित पोलिस स्टेशनला यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांचा भाऊ, भावजय आणि घरातील लोकांच्या विरोधात ही तक्रार होती."
"त्याचदिवशी मयुरी हगवणे यांचे भाऊ मेघराज जगताप यांची दुसरी तक्रार आली. एकाचदिवशी लागोपाठ या दोन्ही तक्रारी आल्या. ७ तारखेला राज्य महिला आयोगाने बावधन पोलिस स्टेशनला कारवाई करण्यासाठी या तक्रारी पाठवल्या. तक्रारदारांना आणि पोलिसांना पत्र पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. कुटुंबातील एकमेकांच्या विरोधातील या तक्रारी असल्याने काऊंसलिंग करून हा कौटुंबिक वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला," असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, "वैष्णवीच्या संदर्भात आयोगाकडे कोणतीही तक्रार नव्हती. पण ही घटना घडल्यानंतर पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अजून काही अधिकचे गुन्हे दाखल करण्याची वैष्णवीच्या पालकांची मागणी असून पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत."
कायदे मोडण्याकडे जास्त कल!
"बालविवाह, हुंडाबंदी, गर्भनिदान चाचणी हे सगळे कायदे असूनही इतक्या मोठ्या प्रमाणात अशा घटना घडतात. हुंड्याची मागणी केल्याने ज्यापद्धतीने महिलांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो त्यामुळे त्या आत्महत्येकडे प्रवृत्त होतात. बालविवाहाचा कायदा असतानाही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सगळ्यात जास्त बालविवाह होताना दिसतात. गर्भनिदान चाचणीचा कायदा असतानाही आपण आपल्या जिल्ह्यात किंवा राज्यात ती चाचणी झाली नाही तर शेजारच्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाऊन ती चाचणी करतो. मुलीचा गर्भ असल्यास तिची हत्या करतो. एकीकडे कायदा, सुव्यवस्था प्रशासन त्यांचे काम करत असते. पण आपल्यासाठी कठोर कायदे असताना ते कायदे मोडण्याकडे आपला जास्त कल आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कुठेही हुंड्याची मागणी केल्यास आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करा," असे आवाहनही रुपाली चाकणकर यांनी यावेळी केले.