काही नोकरदार 58 वर्षे पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्त होतात, तर काही 60 वर्षे झाल्यानंतर. पण, सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर व्हावयास हवे, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. कारण, सेवानिवृत्तीनंतर आपण किमान 25 वर्षे तरी जगणार, हा विचार करून गुंतवणुकीचे नियोजन करायला हवे. त्याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
सेवानिवृत्त नागरिक करीत असलेल्या सर्वांत सामान्य आर्थिक चुकांपैकी एक म्हणजे, आपल्याला पूर्णपणे समजत नसलेल्या व्यवसायांमध्येही ते गुंतवणूक करतात. बेकायदेशीर व्यवसाय किंवा भागीदारीमध्ये गुंतवणूक करून अनेकांनी सेवानिवृत्तीनंतरची मिळालेली संपूर्ण रक्कम गमावलेली आहे. त्यामुळे एखादा व्यवसाय कसा चालतो किंवा त्यात परतावा कसा मिळतो, हे समजत नसेल, तर त्यात गुंतवणूक करू नये. कष्टाने कमावलेले पैसे धोक्यात येणार नाहीत, याची दक्षता घ्यावयास हवी.
बर्याच भारतीय कुटुंबांकडे रिअल इस्टेटच्या माध्यमातून संपत्ती निर्माण झालेली आहे. परंतु, ही रिअल इस्टेट सांभाळणे, हे काम निवृत्तीनंतरच्या काळात त्रासदायक ठरु शकते. देखभालीचा मोठा खर्च, विविध कर आणि भाडेकरूंना हाताळणे यांसारख्या गोष्टी सतत कराव्या लागतात. त्यामुळे या मालमत्तांमधून अनेकदा फक्त दोन ते तीन टक्केच वार्षिक भाडेउत्पन्न मिळते. शिवाय, जुन्या मालमत्तांचे मूल्यही कमी होत असते. त्यांची विक्री करणेही कठीण होते. त्यामुळे सेवानिवृत्तीदाराने निवासस्थान नसलेल्या मालमत्तेची विक्री करण्याचा निर्णय कौटुंबिक स्थितीचा विचार करून जर घेणे गरजेचे असेल, तर घ्यावा. ज्यातून भाडेउत्पन्न कमी आहे किंवा ज्यांचा देखभालीचा खर्च अधिक आहे, अशा मालमत्ता विकण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. अशा मालमत्तांत न्यायालयात दिवाणी दावेही बरेच असू शकतात. सेवानिवृत्तीनंतर दिवाणी दावे लढणे, हे कधीही योग्य ठरू शकत नाही.
सेवानिवृत्तीनंतर तुमची बचत आणि गुंतवणूक किमान 30 वर्षे टिकेल, अशा पद्धतीने करावी. यासाठी सहज गुंतवणूक करता येणार्या, कमी किंवा शून्य जोखमीच्या सातत्यपूर्ण उत्पन्न मिळवून देणार्या गुंतवणूक योजनांचा विचार करावा. जोखीम असलेल्या योजनांमधून उच्च परतावा मिळत असला, तरी अशा गुंतवणूक योजना टाळा, नाहीतर, तुमचा सेवानिवृत्तीचा निधी धोक्यात येऊ शकतो. गेल्या अनेक दशकांपासून स्थिर असलेल्या, महागाईच्या दरानुसार वाढते उत्पन्न देणार्या योजनांकडे लक्ष द्या. सततच्या वाढत्या महागाईमुळे वाढत्या खर्चाचा सामना, सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या निधीतून व्हायलाच हवा, याची दक्षता घ्या. पैसे परत मिळविण्यासाठी कोणत्याही किचकट अटी नसतील, याची खात्री करा.
सेवानिवृत्तीनंतर मुदतठेवींत जास्तीत जास्त गुंतवणूक केली जाते. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, स्टेटबँक, एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय बँक यांचा कारभार चांगला असून, ग्राहकांनी सुरक्षिततेसाठी या बँकांची निवड करायला हरकत नाही. या तीन बँका सोडून अजूनही कित्येक बँकांचा कारभार चांगला चालू आहे. बँकांत ठेवी ठेवणे हे बरेचसे सुरक्षित आहे. बँकेतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षणही असते. पण, कंपन्यांच्या ठेवींत गुंतवणूक करणे जोखमीचे ठरू शकते. बहुसंख्य गुंतवणूकदार या कंपन्यांचे ताळेबंद अभ्यासत नाहीत किंवा त्यांची बाजारातील स्थिती समजून घेत नाहीत. त्यामुळे कंपनीठेवींमध्ये गुंतवणूक करताना दक्षता घ्यावी.
नियमित खर्च कोणते, याची यादी तयार करा. त्यामुळे तुमच्या जीवनशैलीशी कोणतीही तडजोड न करता, त्या खर्चाचे योग्य व्यवस्थापन करण्यास सोपे जाते. तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या निधीपैकी अगदीच गरज लागली, तर निधी वापरावा.
शक्यतो सेवानिवृत्तीनंतरच्या मिळालेल्या पैशाच्या व्याजातूनच गुजराण करणे शक्य असल्यास दक्षता घ्या. जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका, अन्यथा पश्चातापाची वेळ येईल.
सेवानिवृत्तीधारक तोटा होण्याच्या भीतीमुळे बरेचजण कमी परतावा देणार्या योजनांत गुंतवणूक करतात. हादेखील निर्णय योग्य नाही. सेवानिवृत्तीदारांनी त्यांच्या आर्थिक पोर्टफोलिओचे नियमितपणे पुनरावलोकन करावे. सर्व गुंतवणूक सेवानिवृत्तीच्या उद्दिष्टांशी जुळते की नाही, याचे अधूनमधून मूल्यांकन करावे. सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पैसे हे तुमचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी असले, तरी त्यातून पुढील पिढीपर्यंत पोहोचेल, अशा आर्थिक योजना तयार करण्याची संधी मिळते. तुमच्या मुलांना, पतीने पत्नीला व पत्नीने पतीला आर्थिक निर्णय समजावेत म्हणून सहभागी करून घ्या. सर्व गुंतवणूक पर्यायांत नामांकन कराच. कित्येकांच्या बाबतीत त्यांनी केलेली गुंतवणूक कुटुंबातल्या कोणालाच माहिती नव्हती व अशांच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसांना ती ‘ट्रेस’ करणे बरेच त्रासदायक ठरल्याची बरीच उदाहरणे आहेत. कुटुंबातील एकाला तरी सर्व गुंतवणूक पर्यायांची माहिती द्यावी. यामुळे पारदर्शकता निर्माण होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, इच्छापत्र किंवा मृत्युपत्र तयार करावे; म्हणजे कायदेशीर वारसांना विनाकटकट त्यांचा हिस्सा मिळणार. अनेक भारतीय पालक आपल्या स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांना त्यांच्या जीवनभरासाठी आर्थिक मदत करीत राहतात, हे धोरण नक्कीच चुकीचे आहे. मुलांना जिवंत असताना आर्थिक मदत करण्यापेक्षा तुमच्या सेवानिवृत्तीच्या निधीत भर घालण्यास प्राधान्य द्या. मुलांना तुमच्या सेवानिवृत्तीनंतरच्या निधीचा वापर करू देऊ नका. त्यांना त्यांच्या पंखांनी उडू द्या. यामुळे कुटुंब सुरक्षित राहते आणि तुम्हाला चिंतामुक्त सेवानिवृत्तीचा आनंद घेता येतो.
महागाई हा जमविलेला निधी संपविणारा मुख्य घटक आहे. आजचा एक लाख रुपयांचा मासिक खर्च हा दहा ते 15 वर्षांनी दुप्पट होऊ शकतो. कोणत्याही सरकारने कितीही योजना राबविल्या, रिझर्व्ह बँकेने कितीही धोरणे आखली, तरी महागाई ही वाढणारच. मुंबईत काही दिवसांपूर्वी ऑटो रिक्षा, टॅक्सी यांचे भाडे वाढविले; नंतर बेस्ट बसचे भाडे वाढविले. परिणामी, प्रत्येक मुंबईकराचा दिवसाचा खर्च 25 ते 30 रुपयांनी वाढला आहे. प्रत्येक सेवानिवृत्तीधारकाचा आरोग्य विमा हवाच व तो तरुणपणापासूनच उतरविलेला हवा. महागाई दर वार्षिक सहा ते आठ टक्के असतो. हे लक्षात घेऊन जमाखर्चाचे नियोजन करा. आर्थिक शिस्त व काटेकोर नियोजन याची दक्षता घ्या. महागाईचा सामना करण्यासाठी जास्त परताव्याच्या गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका. तुमची क्रयशक्ती तुम्ही जिवंत असेपर्यंत अबाधित राहील, हे लक्षात घ्या.
तुमच्या चुकीच्या नियोजनामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात दुसर्याकडे हात पसरण्याची पाळी येईल, अशी परिस्थिती उद्भवणारच नाही, याची काळजी घ्या. संपत्तीचे नियोजन हे केवळ इच्छापत्र लिहिण्यापुरते मर्यादित नाही. त्याद्वारे तुमच्या संपत्तीचे तुमच्या लाभार्थ्यांपर्यंत सहजतेने संक्रमण होणे महत्त्वाचे आहे. जर नियोजन योग्य नसेल, तर कौटुंबिक वाद आणि कायदेशीर अडचणी निर्माण होतात. सेवानिवृत्तीनंतर लगेचच तपशीलवार इच्छापत्र तयार करून कुटुंबाला विश्वासात घेऊन योग्य व्यक्तींचे नामांकन करा. सर्व कायदेशीर दस्तऐवज अद्ययावत करून ते कुटुंबीयांना उपलब्ध होतील, याची खात्री करा. वारसांमधील गैरसमज टाळण्यासाठी मालमत्तेचे विभाजन स्पष्ट करा. तुमच्या योजना तुमच्या हेतूंशी जुळतात, याची खात्री करण्यासाठी तुमच्या कुटुंबाशी चर्चा करा.
निवृत्तीनंतरच्या आरोग्यसेवेचा खर्च अचानक येऊ शकतो. केवळ एक गंभीर आजार सेवानिवृत्तीची संपूर्ण पुंजी संपवू शकतो. भारतातील वाढत्या वैद्यकीय खर्चाचा विचार केल्यास, सर्वसमावेशक आरोग्यविमा निवृत्तीधारकाकडे असावयास हवा. आर्थिक सुरक्षेसाठी किमान 50 लाख रुपये ‘कव्हर’ असलेली आरोग्यविमा पॉलिसी निवडा. या पॉलिसीत गंभीर आजारांसाठीचे उपचार,
आधीपासून असलेल्या आजारांवरील उपचार, रुग्णालयाचा खर्च, रुग्णालयातून घरी आल्यावर काही दिवस उपचारांवर मिळणारी दाव्याची रक्कम, या सर्व तरतुदींची खात्री करून घ्या. डे-केअर हॉस्पिटलायझेशन व कॅशलेस सुविधा उपलब्ध असणारी पॉलिसी घ्यावी. दावा करताना येणार्या अडचणी टाळण्यासाठी पॉलिसीचे नियम व अटी यांची नीट माहिती घ्या. निवृत्तीनंतर मिळालेल्या संपत्तीचा यथायोग्य वापर व्हावा, म्हणून पैसे काढण्याचे एक शाश्वत घोरण ठेवा. सेवानिवृत्तीनंतर पुढील 20 ते 25 वर्षांसाठीचा मासिक खर्च, महागाई आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करता यावा, यासाठी सेवानिवृत्त निधी किती आहे, त्यानुसार आखणी करा. खूप आक्रमकपणे खर्च करू नका किंवा जीवाला मारून अति काटकसरही करू नका.
तुमचा सेवानिवृत्त निधी तुम्ही जिवंत असताना संपणार नाही, याची दक्षता घ्या. जर असे घडले, तर तुमचे उर्वरित आयुष्य त्रासदायक जाईल. अनेक दशकांच्या मेहनतीनंतर सेवानिवृत्तीचा निधी मिळालेला असतो. हीच सेवानिवृत्तीधारकाची आयुष्याभराची कमाई असते, मौल्यवान संपत्ती असते. पैशाचे व्यवस्थापन करणे जर तुम्हाला जमण्यासारखे नसले, तर अनुभवी व जबाबदार आर्थिक मार्गदर्शकच तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक व चांगला परतावा, याबाबत योग्य मार्गदर्शन करू शकेल. त्यामुळे तुमच्यावर आर्थिक निर्णय घेण्याचा तणाव येणार नाही.
सेवानिवृत्ती ही आर्थिक ताण आणि चिंता यांपासूनची मुक्ती आहे. तुम्ही या काळात तुम्हाला हवा तसा जीवनाचा आनंद घेण्यास मोकळे असता. पण, त्यासाठी विचारपूर्वक नियोजन, शिस्तबद्द निर्णयक्षमता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिकता हवी!