भारताचं शिष्टमंडळ पोहोचण्याआधी रशियातील मॉस्कोत ड्रोन हल्ला!

    23-May-2025   
Total Views |

Drone Attack In Moscow Delays Kanimozhi-Led Op Sindoor Delegation
 
 
नवी दिल्ली : (Drone Attack In Moscow Delays Kanimozhi-Led Op Sindoor Delegation's Flight) भारताच्या 'दहशतवादाविरोधी शून्य सहनशीलतेच्या' भूमिकेचा जागतिक पातळीवर प्रचार करण्यासाठी रवाना झालेल्या सर्वपक्षीय भारतीय शिष्टमंडळाच्या मॉस्को दौऱ्यापूर्वीच रशियातील राजधानी मॉस्कोमध्ये मोठा ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यानंतर मॉस्को विमानतळावरील अनेक उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली. यामध्ये द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे विमानही उशिराने पोहोचले.
 
या शिष्टमंडळात द्रमुकच्या खासदार कनिमोळी, समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय, आरजेडीचे प्रेमचंद गुप्ता, भाजपचे कॅप्टन ब्रिजेश चौटा, आम आदमी पक्षाचे डॉ. अशोक कुमार मित्तल आणि माजी राजदूत मंजीव सिंग पुरी यांचा समावेश आहे. हे सर्व सदस्य भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूरविषयी तसेच भारताची दहशतवादविरोधी भूमिका जगासमोर मांडण्यासाठी रशियाच्या दौऱ्यावर निघाले होते.कनिमोळी यांनी शिष्टमंडळासोबत मॉस्कोला रवाना होतानाचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली.
 
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, गुरुवारी संध्याकाळपासून हवाई संरक्षण प्रणालीने ११२ युक्रेनियन ड्रोन पाडले, ज्यामध्ये मॉस्कोच्या दिशेने जाणाऱ्या २४ ड्रोनचाही समावेश होता. गेल्या काही महिन्यांत मॉस्कोमध्ये ड्रोन हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, परंतु राजधानीवर थेट हल्ले तुलनेने कमीच होते. तसेच गेल्या तीन दिवसांत देशभरात किमान ४८५ ड्रोन हल्ले झाले आहेत. एकट्या मॉस्को आणि त्याच्या आसपासच्या भागात ६३ ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न झाले.
 
या घटनांमुळे मॉस्कोमधील हवाई सेवा तीन तासांहून अधिक काळ विस्कळीत झाली आणि विमानतळ बंद करावे लागले. परिणामी, भारतीय शिष्टमंडळाचे विमान बरेच तास आकाशात फिरत राहिले कारण त्याला उतरण्याची परवानगी मिळत नव्हती. अखेर, सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, विमान विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. मॉस्कोमध्ये पोहोचल्यानंतर, भारताचे राजदूत विनय कुमार यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले आणि भारत-रशिया संबंधांबाबत त्यांना माहिती दिली.
 
हे शिष्टमंडळ रशियानंतर स्लोव्हेनिया, ग्रीस, लाटविया आणि स्पेनला भेट देणार असून, सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात भारताची 'शून्य सहनशीलतेची' भूमिका आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत पोहोचवणार आहे. श्रीनगर जवळील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने १७ मे रोजी सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांची घोषणा केली होती, जे भारताची अधिकृत भूमिका जागतिक व्यासपीठावर मांडतील.
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\