ज्योती मल्होत्राचा चारवेळा मुंबई दौरा! मुंबई लोकलने प्रवास, लालबागच्या राजाचं दर्शन; नेमका काय होता प्लॅन?

    22-May-2025   
Total Views |

spy youtuber jyoti malhotra visited mumbai 4 times since july 2023 
 
मुंबई : (Jyoti Malhotra) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये ज्योतीने चारवेळा मुंबई दौरा केल्याची खळबळजनक बाब तपासातून समोर आली आहे. याचदरम्यान मुंबईत ज्योती नेमकं कुठे-कुठे फिरली, या दौऱ्यामागे नेमकं काय कारण होतं, याचा तपासयंत्रणाकडून शोध सुरु आहे.
 
माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राने चारवेळा मुंबई दौरा केला आहे. तिचा हा मुंबई दौरा आता तपास यंत्रणांच्या स्कॅनरवर आला आहे. साल २०२३ मध्ये एकदा तर २०२४ मध्ये सलग तीनवेळा ती मुंबईत आली होती. ज्योती जुलै २०२४ मध्ये लक्झरी बसने मुंबईत आली, ऑगस्ट २०२४ मध्ये कर्णावती एक्सप्रेसने अहमदाबादहून मुंबईत आली, तर सप्टेंबर २०२४ मध्ये ती दिल्लीहून पुन्हा मुंबईत आली. विशेष म्हणजे २०२३ मध्ये गणेशोत्सवादरम्यान ती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आली होती. या दौऱ्यादरम्यान तिने लाखो भाविकांच्या गर्दीचे आणि परिसराचे व्हिडिओ रेकॉर्ड केले असल्याचे तपासात उघड झाले आहे.
 
ज्योतीचा मुंबई लोकलने प्रवास
 
लालबाग दौऱ्यादरम्यान ज्योतीनं मुंबई लोकलचाही प्रवास केल्याची माहिती समोर आलीय. बोरिवली या ठिकाणी ती उतरली होती. तिथून लोकलने ती दादरला आली. दादरहून तिने पुन्हा लोकल ट्रेन बदलली आणि ती करी रोडला उतरली. तिथून चालत ती मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली. तिथे तिने दर्शन घेतलं आणि मग तिथून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभी राहिली होती. त्यासंदर्भात तिने एक सविस्तर ट्रॅव्हल व्लॉगही केला होता. जो युट्यूबवर दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला होता. हे व्हिडीओ, फोटो ज्योतीने कोणाला पाठवले याचा तपास सुरू आहे. तिने मुंबईची रेकी केली होती का, त्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास आता यंत्रणा करत आहेत.
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\