अमेरिकेचे सुवर्णकवच

    21-May-2025   
Total Views |
अमेरिकेचे सुवर्णकवच

माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ आले आहे, असे आपण अगदी सहजपणे म्हणतो. संपर्कसाधनांच्या विस्तारामुळे मानवी आयुष्यातील हा एक सकारात्मक तांत्रिक आविष्कारच. परंतु, याच जग जवळ येण्याच्या वास्तवामुळे अमेरिकेसारखी महासत्ताही धास्तावलेली दिसते. म्हणूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संभाव्य हल्ल्यांपासून देशाच्या रक्षणासाठी ‘गोल्डन डोम’ यंत्रणा विकसित करणार असल्याची घोषणा केली. तेव्हा, अमेरिकेला नेमके या सुवर्णकवचाची गरज का भासावी, याविषयी जाणून घेणे क्रमप्राप्त ठरावे.


उत्तर अमेरिका खंड हा तसा मुख्य भूमीपासून हजारो मैल लांब. त्यामुळे अमेरिकेच्या भूमीवर तसा प्रत्यक्ष युद्धाचा धोकाही अन्य देशांच्या तुलनेत कमीच. दुसर्‍या महायुद्धाच्या काळातही जपानने अमेरिकेवर केलेले हल्ले हे बहुतांशी किनारी भागापुुरतेच मर्यादित होते. त्यानंतर अमेरिकेला हादरवून सोडले ते 9/11च्या जागतिक व्यापार केंद्राच्या जुळ्या मनोर्‍यांवर दहशतवाद्यांनी हायजॅक केलेल्या प्रवासी विमान हल्ल्याने. या हल्ल्यात दोन हजार, 996 नागरिक मृत्युमुखी पडले आणि 15 हजारांहून अधिक जखमी झाले. ‘अल कायदा’ने घडवून आणलेला हा अमेरिकेच्या इतिहासातील आजवरचा सर्वांत भीषण असा दहशतवादी हल्ला होता. 2001 सालच्या या विध्वंसक हल्ल्यानंतर अमेरिकाही सर्वार्थाने हादरली. आशिया-युरोपच्या मुख्य भूमीपासून हजारो मैल दूर असलो, तरी दहशतवादी हल्ल्याची अशी भीषण छळ आपल्यालाही बसू शकते, याची प्रचिती अमेरिकेला आली. त्यामुळे अन्य देशांच्या भूभागाचा वापर करून सैनिकी कारवाया करण्यात धन्यता मानणार्‍या अमेरिकेचे डोळे 9/11 नंतर खाडकन उघडले. अमेरिकेच्या सुरक्षाव्यवस्थेतही त्यानंतर मोठी स्थित्यंतरे पाहायला मिळाली. आताही भविष्यातील धोके वेळीच ओळखून ट्रम्प सरकारने अमेरिकेत ‘गोल्डन डोम’ उभारणीचा मानस जाहीर केला आहे. त्याअंतर्गत जमिनीवर तसेच अंतराळातही ही सुरक्षायंत्रणा तैनात केली जाईल. म्हणजेच जमिनीवरून, समुद्रातून, विमानातून अथवा अंतराळातून असे कुठल्याही प्रकारचे अमेरिकेवरील क्षेपणास्त्र, ड्रोनहल्ले ही यंत्रणा यशस्वीपणे परतावून लावेल. इस्रायलच्या ‘आर्यन डोम’ या सुरक्षाकवचाप्रमाणेच अमेरिकेचे हे ‘गोल्डन डोम’ शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याला निष्प्रभ करण्यासाठी सक्षम ठरेल. यासाठी ट्रम्प यांनी 175 अब्ज डॉलर्सचा निधीही प्रस्तावित केला. परंतु, तज्ज्ञांच्या मते, हा खर्च तब्बल एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे आधीच अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण असताना, ‘गोल्डन डोम’चा खर्च अमेरिकेला कितपत पेलवणार, हा प्रश्नदेखील यानिमित्ताने उपस्थित व्हावा.


त्यातच प्रचंड महत्त्वाकांक्षी असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजे 2029 सालच्या अखेरीस हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, अशीही घोषणा यावेळी केली. पण, अमेरिकेतील संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी याविषयी साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे केवळ राजकीय लाभापोटी आणि ‘मीच अमेरिकेचा संरक्षक’ अशा प्रतिमानिर्मितीसाठीच ट्रम्प यांचा हा सगळा खटाटोप असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्याचबरोबर चीननेही अमेरिकेच्या या निर्णयाचा विरोध दर्शविला असून, चिंता व्यक्त केली आहे.


अमेरिकेने भविष्यातील संकटाची चाहूल वेळीच ओळखून अंतराळसेना तैनात करण्याची प्रक्रिया मागेच आरंभली. कारण, चीनही अंतराळयुद्धातून अमेरिकेवर कुरघोडी करु शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यातच ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताच्या ‘एस-400’ सुरक्षा प्रणालीची आवश्यकता आणि परिणामकारकता जगासमोर आली. त्यादृष्टीनेही अमेरिकेच्या ‘गोल्डन डोम’ विकसित करण्याच्या निर्णयाकडे पाहता येईल. पण, तरीही मुळात ‘थाड’, ‘एजीस’ सारखी क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली असताना, ‘गोल्डम डोम’ कशासाठी असा प्रश्न उद्भवणेही साहजिकच. त्याचे उत्तर हे ट्रम्प यांच्या व्यापारी मानसिकतेत दडलेले दिसते. ‘गोल्डन डोम’ विकसित केल्यानंतर आधीच्या सुरक्षाप्रणालींचा अन्य देशांतील विक्रीचा मार्गही अधिक प्रशस्त होईल. सौदी आणि युकेबरोबर ‘थाड’ प्रणाली कराराविषयी चर्चाही सुरू आहेत. असा हा ट्रम्प यांनी साधलेला दुहेरी डाव म्हणावा लागेल.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची