मराठी चित्रपट सृष्टीच्या गौरवाचा सोहळा: ‘मातृभाषा सन्मान पुरस्कार २०२२’ उत्साहात संपन्न

    20-May-2025   
Total Views |


matrubhasha samman puraskar 2022’



मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील असंख्य कलाकारांच्या योगदानाचा गौरव करणारा "मातृभाषा सन्मान पुरस्कार" सोहळा यंदा १४ मे २०२४ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे अत्यंत भव्यदिव्य आणि सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला. नारायण देसाई फाउंडेशनतर्फे आयोजित या सोहळ्याचे उद्दिष्ट होते राष्ट्रीय पातळीवर मराठी सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि विकास घडवणे, तसेच सिनेसृष्टीतील गुणवंत कलाकारांना सन्मानित करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे.

कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री उदय देशपांडे, अभिनेते चेतन दळवी, अनंत जोग, विजय पाटकर आणि संकलक-दिग्दर्शक संजीव नाईक यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक आयदान देसाई यांनी या वेळी कार्यक्रमाचा उद्देश विशद करताना मराठी चित्रपटाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

या पुरस्कार सोहळ्यात विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करण्यात आला. ‘धर्मवीर’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक (प्रवीण तरडे), अभिनेता (प्रसाद ओक), गीत (संगीता बर्वे – भेटला विठ्ठल), गायक (सौरभ साळुंखे – आनंद हरपला), रंगभूषा, पटकथा अशा अनेक विभागांमध्ये बाजी मारली. तसेच ‘इंटरनॅशनल फोक फिल्मफोक’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, कथा, पदार्पण अभिनेता (योगेश खिलारे), पदार्पण दिग्दर्शक (धीरज गुरव) या महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपली छाप उमटवली.

‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटासाठी सोनाली कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि पुष्कर जोग यांना नकारात्मक भूमिकेचा पुरस्कार देण्यात आला. ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटासाठी गश्मीर महाजनी (सहायक अभिनेता), महेश लिमये (छायांकन), मयूर हरदास (संकलन), विद्याधर भट्टे (रंगभूषा), मदन माने (कला दिग्दर्शक) आणि प्रवीण तरडे (संवाद) यांना सन्मानित करण्यात आले. ‘लोच्या झाला रे’ या चित्रपटातील गाण्यासाठी अपेक्षा दांडेकर (गायिका), प्रसाद खांडेकर (विनोदी भूमिका) यांना पुरस्कार प्राप्त झाले.

याच कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्काराने चेतन दळवी यांना सन्मानित करण्यात आले तर अनंत जोग यांना ‘विशेष योगदान’ पुरस्कार देण्यात आला. समीक्षक कोळंबकर यांना ‘दखलपात्र प्रसिद्धी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हास्यरत्न पुरस्कार हे दामू अण्णा मालवणकर आणि वसंत शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले गेले. यामध्ये विजय पाटकर, सागर कारंडे, गौरव मोरे, अंकुर वाढवे आणि प्राजक्ता हनमघर यांचा गौरव करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा केवळ सन्मानाचा नव्हे, तर मराठी चित्रपट सृष्टीच्या नव्या उमेदीस प्रेरणा देणारा ठरला. नवोदित कलाकारांपासून ज्येष्ठ तंत्रज्ञांपर्यंत प्रत्येकाला गौरविणारा हा उपक्रम मराठी सिनेमा क्षेत्रात आशेचा नवा किरण ठरत आहे. नारायण देसाई फाउंडेशनचा हा उपक्रम आगामी काळातही मराठी चित्रपट सृष्टीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केला.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.