मुंबई : आपल्या भारत देशाला लाभलेला इतिहास हा केवळ गौरवशालीच नाही, तर प्रेरणादायी देखील आहे. हाच इतिहास जपण्याची आणि पुढील पिढीला समजावून सांगण्याची एक सशक्त वाट म्हणजे कला आणि रंगभूमी. डोंबिवलीतील ‘बीइंग कलाकार' या संस्थेने हीच संकल्पना मनात ठेवत, अत्यंत अभिमानाने आणि कलाभिवृद्धीसाठी 'रंगोदय एकांकिका महोत्सव २०२५' चे आयोजन केले आहे.
२५ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे हा एकांकिका महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित सादरीकरणे – एक ऐतिहासिक संशोधनाला चालना देणारी आणि दुसरी पारंपरिक मूल्यांना उजाळा देणारी.
पहिली एकांकिका नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमय मृत्यूवर आधारित असून, १९४५ मध्ये झालेल्या विमान अपघातानंतर ते खरेच वारले होते का, की कुठे तरी गुप्तपणे जगत होते – या प्रश्नांची उत्तरं शोधणारी ही सादरीकरण आहे. नेताजींवर अनेक चर्चा आणि वादंग झाले, पण त्यांच्या निधनानंतरच्या काळावर फारसा प्रकाश टाकला गेला नाही. ही एकांकिका त्या दुर्लक्षित वास्तवाची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहे, जो प्रेक्षकांच्या विचारांना चालना देईल.
दुसरी एकांकिका ‘भोंडला’ या पारंपरिक खेळावर आधारित असून, ही एक भावनिक कथा आहे नात्यांची, हरवलेल्या परंपरांची आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगात विस्मृतीत गेलेल्या मूल्यांची. भोंडला हा महिलांच्या आनंदाचा, एकोप्याचा आणि सर्जनशीलतेचा खेळ, जो आजच्या काळात हरवू लागला आहे – तो पुन्हा जिवंत करण्याचा, त्या मागच्या भावना समजावून घेण्याचा प्रयत्न या एकांकिकेतून होणार आहे. हा एकांकिका महोत्सव केवळ मनोरंजनाच्या चौकटीत न बसता सामाजिक आणि सांस्कृतिक भान जपणारा आहे. परंपरेची जपणूक, इतिहासाचे चिंतन आणि समाजात हरवत चाललेल्या मूल्यांना नवसंजीवनी देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
‘बीइंग कलाकार’ या संस्थेचा नेहमीच अशा वेगळ्या आणि अर्थपूर्ण उपक्रमांवर भर असतो. त्यांची ही कलात्मक वाटचाल आणि सामाजिक जबाबदारीची भावना, डोंबिवलीतील प्रेक्षकांना अधिक समृद्ध अनुभव देणार आहे. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांसाठी काही ना काही देणारा असा हा महोत्सव, इतिहासाचे वास्तव आणि परंपरेचे मोल अधोरेखित करणार आहे.
२५ मे, सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रंगणारा ‘रंगोदय एकांकिका महोत्सव २०२५’ हा केवळ रंगमंचावरील कार्यक्रम नसून, तो आपल्या संस्कृतीला पुन्हा नवजीवन देणारा पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आपण उपस्थित राहा आणि इतिहासाला विसरू नका.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.