इस्लामाबाद : (Four Children Killed in Pakistani Drone Strike in North Waziristan) पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तानमधील मीर अली गावात सोमवारी २० मे रोजी सकाळी सुमारे ६:३० वाजता झालेल्या पाकिस्तानी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर दोन महिन्यांच्या बाळासह अनेक महिला गंभीर जखमी झाल्या. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, लष्कराने बंडखोरांच्या संशयावरून केलेला हा हल्ला एका सामान्य नागरिकाच्या घरावर झाला. ही घटना काही अपवादात्मक नाही. याआधी १६ मे रोजी डेरा इस्माईल खान येथे झालेल्या आणखी एका ड्रोन हल्ल्यातही आठहून अधिक मुले जखमी झाली होती. वारंवार होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून, पाकिस्तानी लष्कर बिनदिक्कतपणे आणि कोणतीही पूर्वतपासणी न करता नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उत्तर वझिरिस्तान जिल्हा बार असोसिएशनने पूर्ण न्यायालयीन बंद पुकारला असून, लष्कराच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानच्या लष्कराने बंडखोरांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली आहे, मात्र त्यात अनेक वेळा सामान्य नागरिकही बळी पडत असल्याने लष्कराच्या कारवायांवरील प्रोटोकॉल, निर्णयक्षमता आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अचूकतेचे दावे करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या कारवायांमध्ये सातत्याने निष्पाप लोक मृत्युमुखी पडत असल्याने, हे हल्ले सामर्थ्यप्रदर्शनापेक्षा जबाबदारी आणि धोरणात्मक शिस्तीच्या अभावाचे द्योतक ठरत आहेत. त्यामुळे देशभरात पाकिस्तानी लष्कराविरोधात निदर्शने सुरू झाली असून, पाकिस्तानने जनतेच्या सुरक्षेच्या प्रश्नांकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\