चीनी आणि तुर्की वस्तूंवर बहिष्कार घाला!

वीरमाता अनुराधा गोरे आणि डॉ. मंजू लोढा यांच्या नेतृत्वात मुंबईत "सिंदूर यात्रा"!

    20-May-2025
Total Views |
 
Sindoor Yatra
 
मुंबई : भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मंगळवार, २० मे रोजी वीरमाता अनुराधा गोरे आणि समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांची विशेष 'सिंदूर यात्रा' आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत हजारों महिलांनी पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चिनी आणि तूर्कस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली.
 
काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी दहशतवादविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर वीरमाता अनुराधा गोरे आणि समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ गिरगाव परिसरात सिंदूर यात्रा काढण्यात आली. राज्यात प्रथमच महिलांच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी अशा प्रकारची यात्रा आयोजित करण्यात आली. या यात्रेत हजारो महिला लाल साड्या परिधान करून हातात राष्ट्रध्वज घेत सहभागी झाल्या.
 
 
गावदेवी येथील मणी भवन येथून ही यात्रा सुरु झाली असून हिरोज ऑफ किलाचंद उद्यानाजवळ यात्रेची सांगता झाली. यावेळी शाहिद सैनिकांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी देण्यात आलेल्या राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी गिरगाव परिसर दणाणून गेला. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीदेखील या यात्रेत सहभागी होत भारतीय सैनिकांना मानवंदना दिली.
 
याप्रसंगी बोलताना वीरमाता अनुराधा ताई गोरे म्हणाल्या की, "शहिदांचे बलिदान कधीही वाया जात नाही, तर त्यातून अनेक वीर तयार होतात. भारत ही वीरांची भूमी आहे आणि नारीशक्तीने त्यांच्या सदैव पाठीशी उभे राहायला हवे.” डॉ. मंजू लोढा म्हणाल्या की, "भारतीयांचे आपल्या सैन्यावर जीवापाड प्रेम आहे. पण एवढेच करून चालणार नाही तर प्रत्येक नागरिकाने वर्षातला एक सण जवानांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांसह साजरा केला पाहिजे. त्यामुळे सीमेवर तैनात असलेल्या जवानांचे आत्मबळ वाढेल," असे त्या म्हणाल्या.
 
"देशाचा प्रत्येक नागरिक भारतीय सैन्याच्या आणि सरकारच्या सोबत आहे. पहलगाममध्ये आमच्या ज्या २७ बहिणींचे कुंकू पुसले गेले त्या एकट्या नसून आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत, हा संदेश आम्ही या रॅलीतून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही कायम अहिंसेचा मार्ग अवलंबला. पण पाकिस्तानने कायम आमच्या पाठीत खंजीर खुपसला. परंतू, आता आम्ही सहन करणार नाही."
- डॉ. मंजू लोढा
 
"संपूर्ण देशात देशभक्तीची लाट आहे. पाकिस्तानने केलल्या कृत्याबद्दल सर्वांच्या मनात आक्रोश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्यदलाने पराक्रम दाखवला. या सैनिकांच्या सन्मानार्थ दक्षिण मुंबईच्या महिलांनी मोठी यात्रा काढली आहे. भारतीय सैन्याने जीवाची बाजी लावून पराक्रम केला. त्यांच्यावर शंका उपस्थित करणे म्हणजे मुर्खपणा आहे."
- मंगल प्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री