परिवहन विभागात ऑनलाईन बदल्या
१५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थिती करण्यात आल्या बदल्या
Total Views |

मुंबई : मोटार परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यामुळे पारदर्शकते बरोबरच जास्तीत जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत सोमवार,दि.१९ रोजी मंत्रालयातील त्यांच्या दालनात परिवहन विभागाकडील १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑन लाईन बदल्या करण्यात आल्या. या संदर्भात आयोजित बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, "ऑनलाइन बदल्या करतांना अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या विशेषतः महिलांच्या समस्या जाऊन घेऊन त्या दूर करण्यास प्राधान्य द्यावे. भविष्यात अधिकाऱ्यांना ३ ऐवजी ५ पसंती क्रम दिल्यास ऑन लाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचे ठिकाण मिळण्यास मदत होईल. पुढील वर्षापासून ऑन लाईन बदली प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबवावी. यावेळी गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ऑनलाईन बदल्यांचाही आढावा घेण्यात आला.