सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा, दिरंगाई नको! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
19-May-2025
Total Views |
नागपूर : स्थानिक पातळीवर लोकांचे प्रश्न संबंधित कार्यालयाद्वारे तात्काळ मार्गी लागलेच पाहिजेत. त्यात दिरंगाई होता काम नये, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार, १८ मे रोजी अधिकाऱ्यांना दिले. नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने नियोजन भवन येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी पांदन रस्ते, शेतजमिनीवरील अतिक्रमण, घरकुल योजना, पाणी समस्या, आरोग्य, समस्या, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक आणि महसूल संबंधित अशा अनेक विषयांवर निवेदने दिली. तसेच विविध समस्यांवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधला.
मंत्री चंद्रशेकर बावनकुळे म्हणाले की, "लोकांचे प्रश्न त्या त्या स्थानिक पातळीवर, संबंधित कार्यालयाद्वारे त्वरीत मार्गी लागली तर जनसंवादाला लोकांना यायची वेळ पडणार नाही. लोकांची कामे तात्काळ व्हावी ही अपेक्षा चुकीची नाही. प्रत्येक नागरिकाला शासनाशी सदैव काम पडते असेही नाही. अनेक शेतकरी नैसर्गिक आव्हानाशी तोंड देत झालेले नुकसान त्याला सोसता यावे, त्यात काही मदत मिळावी म्हणून शासनाकडे येतात. तहसील कार्यालयाशी संपर्क साधतात. त्यामुळे नियमात असणारी कामे तात्काळ मार्गी लागलीच पाहिजेत. यात दिरंगाई होता काम नये," अशा सूचना त्यांनी दिल्या.