‘ऑपरेशन सिंदूर’-नव्या भारताचा शंखनाद

    18-May-2025
Total Views |
 
Operation Sindoor new India
 
पहलगाममधील पाकिस्तान पुरस्कृत भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून चोख प्रत्युत्तर दिले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामुळे एकीकडे पाकिस्तानची लष्करी क्षमता क्षीण झाली, तर भारताच्या अचाट युद्धकौशल्याचे दर्शन जगाला झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामधील सुप्त घटनांचा हा घेतलेला आढावा...
 
11 मे रोजी संध्याकाळी 6.30 वाजता भारतीय सैन्याच्या ‘डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स’ची पत्रकार परिषद झाली, ज्यामध्ये त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेचा पूर्णपणे आढावा घेतला. यामध्ये असे स्पष्ट करण्यात आले की, आपल्या सैनिकी मोहिमेचा उद्देश दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करणे होते आणि त्यामध्ये आपल्याला 100 टक्के यश मिळाले आहे. पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करणे, हे सध्याचे भारतीय सैन्याचे उद्दिष्ट नव्हते. पाकिस्तानबरोबरच्या या युद्धामध्ये आपल्या पाच सैनिकांना वीरगती प्राप्त झाली आणि पाकिस्तानचे 30 ते 35 सैनिक मारले गेल्यचे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही चालूच आहे आणि यापुढे पाकिस्तानने कुठलेही दुष्कृत्य केले, तर त्यांना अशीच मोठी किंमत चुकवावी लागेल.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताने राबवलेले फक्त एक सैनिकी अभियान नव्हते, तर तो एक सामरिक, तांत्रिक आणि राजनैतिक संदेश होता की, भारत आता यापुढे कोणत्याही दहशतवादी कारवाया सहन करणार नाही.
 
कमिकाझे ड्रोन, क्षेपणास्त्र, तोफगोळ्यांचे हल्ले परतवले
 
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवायांमुळे पाकिस्तानच्या दहशतवादी यंत्रणेला, हवाई संरक्षण प्रणालींना आणि लष्करी तळांना गंभीर नुकसान पोहोचले. यावेळी पाकिस्तानाने नियंत्रण रेषेपासून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत 26 ते 36 ठिकाणी केलेले कमिकाझे ड्रोन, क्षेपणास्त्र आणि तोफगोळ्यांचे हल्ले, भारतीय सैन्याने यशस्वीपणे परतवले.
 
कारवाईची रूपरेषा
 
भारतीय सैन्याची कारवाई अत्यंत नियोजनबद्ध होती. कारवाईची सुरुवात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ल्यांपासून झाली. या हल्ल्यांत ‘राफेल’ विमानांमधून प्रक्षेपित केलेले ‘स्काल्प क्रूझ क्षेपणास्त्र’, ‘हॅमर स्मार्ट वेपन्स’, ‘मार्गदर्शित बॉम्ब’, ‘च777 एक्सॅलिबर शेल्स’ आणि ‘लोइटरिंग म्युनिशन्स’ यांचा वापर करण्यात आला. या तडाख्यात सुमारे 100 दहशतवाद्यांचा खात्मा तसेच कमांड सेंटर्स, रडार आणि दारूगोळ्याची गोदामे उद्ध्वस्त करण्यात आली.
 
पाकिस्तानचा अयशस्वी प्रयत्न
 
पाकिस्तानने त्यानंतर प्रत्युत्तरासाठी 300 ते 400 तुर्की बनावटीचे ‘सॉन्गर’ ड्रोन आणि तोफ गोळ्यांचा वापर केला. मात्र, भारताच्या एस-400, बाराक-8, आकाश, डीआरडीओचे अ‍ॅण्टी-ड्रोन सिस्टम्स यांनी युक्त एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीने आणि जलद प्रतिसाद देणार्‍या शस्त्रांनी हे हल्लेही निष्फळ ठरवले.
 
भारताचे निर्णायक प्रत्युत्तर
 
दि. 10 मे रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील आठ अतिरिक्त लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. यामध्ये रफिकी, मुरीदके आणि सियालकोटमधील हवाई तळांचाही समावेश होता. या कारवायांमुळे भारताची संयमित पण निर्णायक भूमिका अधोरेखित झाली असून, पाकिस्तानच्या तुलनेत भारताचे प्रत्युत्तर लक्षणीय ठरले आहे, अगदी अमेरिकेच्या मध्यस्थीतील युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा.
 
सामरिक आणि राजनैतिक संदेश
 
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दाखवले की, तो आता पश्चिमी देशांच्या मतांची प्रतीक्षा न करता राष्ट्रीय हिताचा विचार करूनच निर्णय घेतो. आता या ‘ऑपरेशन’मुळे भारतीय संरक्षण उद्योगाला आणखी चालना मिळेल आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेला जबरदस्त वेग मिळेल.
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘ट्विट’
 
भारत पाकिस्तानच्या शस्त्रसंधीविषयी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्विट’ करण्याआधी दुपारी 3.30 वाजता, पाकिस्तानी लष्कराच्या लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) भारताच्या डीजीएमओ यांना फोन करून, शस्त्रसंधीची तयारी दर्शवली. त्यांच्याच झालेल्या चर्चेनंतर वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन, हा निर्णय घेतला गेला.
 
भारताने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले. पहिल्यांदाच आपण सीमारेषेपलीकडील 100 किमीहून दूरच्या लक्ष्यांचा अचूक भेद केला. पाकिस्तानच्या महत्त्वाच्या विमानतळांना लक्ष्य करत, आपण त्यांची हवाई सुरक्षा यंत्रणाच नष्ट केली. त्यामुळे पाकिस्तानच्या मारकक्षमतेवरच मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानने शस्त्रसंधीचा बचावात्मक पवित्रा घेतला.
 
चिनी तंत्रज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट
 
याशिवाय शस्त्रसंधीसाठी पाकिस्तानवर चीनचाही प्रचंड दबाव होता. पाकिस्तानकडील सुमारे 50 टक्के शस्त्र ही चिनी बनावटीची आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान काही दिवसांत भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये चिनी बनावटीच्या हवाई सुरक्षा यंत्रणा, क्षेपणास्त्रे, ड्रोन्स आदी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे भारत-पाक संघर्ष अधिक काळ चालल्यास आपल्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट होतील, अशी भीती चीनला वाटत होती. याशिवाय, शस्त्रसंधीचा निर्णय घेताना, आपण अमेरिकेकडूनही काही हमी घेतली असण्याची शक्यता आहे. यामध्ये भारत-अमेरिका व्यापार करार मार्गी लावून घेण्याचाही समावेश असू शकतो. तसे झाल्यास, भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. याशिवाय आपल्या हवाई दलासाठी आवश्यक इंजिन्स व अन्य तंत्रज्ञानही आपण अमेरिकेकडून मिळवू शकतो. भारताचा शस्त्रसंधीचा निर्णय योग्य होता का? आपण शस्त्रसंधी करण्यापूर्वी पाकिस्तानला पुरेसा धडा शिकवलेला नाही, असे काहींचे मत आहे. यामागची कारणे आता सांगता येणार नाहीत. पाकिस्तान हा अत्यंत धोकादायक देश असोन, त्याच्यावर आपण कधीही विश्वास ठेवू शकत नाही. आधी केलेल्या शस्त्रसंधी कराराचेही पाकिस्तानने अनेकदा उल्लंघन केले आहे. देशाची दोन शकले झाल्यानंतरही, पाकिस्तानच्या वृत्तीत फरक पडलेला नाही.
 
मात्र, अमेरिकेच्या पुढाकाराने झालेल्या या शस्त्रसंधीनंतर आता आपल्याबरोबरच अमेरिकाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पाकिस्तानवर लक्ष ठेवेल. तिथे दहशतवादी तयार होत नाहीत ना, त्यांची घुसखोरी तर घडवून आणली जात नाही ना, यावर त्यांचे लक्ष राहील. शस्त्रसंधी होण्यापूर्वी काही तास आपण एक नवी घोषणा केली आहे. “देशात यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास ते देशाविरोधातील युद्ध मानले जाईल आणि त्याप्रमाणे त्याला प्रत्युत्तर दिले जाईल,” असे आपण स्पष्ट केले आहे. या दोन्ही बाबींमुळे भविष्यात दहशतवादी हल्ल्यांना आळा बसण्याची आशा आहे.
 
अमेरिकेच्या मदतीने झालेली शस्त्रसंधी दोन ताससुद्धा टिकली नाही आणि पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत, ड्रोनने भारताच्या विमानतळांवर हल्ला केला.अर्थात सगळी पाकिस्तानची ड्रोन्स पडली गेली आणि भारतानेसुद्धा प्रतिहल्ला करून पाकिस्तानचे नुकसान केले.
 
‘ऑपरेशन सिंदूर’ चालूच राहील
 
दि. 11 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की, भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे चालूच राहील. म्हणजे जर पाकिस्तानी शस्त्रसंधी तोडली, तर त्याचे प्रत्युत्तर पाकिस्तानचे पाच पटीने जास्त नुकसान करून आपण करायला पाहिजे.
पाकिस्तानबरोबरची लढाई दीर्घकाळ चालणारी असून, आपण ‘मल्टी डोमेन’ युद्धाच्या माध्यमातून पाकिस्तानची दहशतवादी कृत्य करण्याची आणि लढण्याची क्षमता कमी करण्याचा प्रयत्न सातत्यानेर केला पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानमधील अंतर्गत सुरक्षेची आव्हाने फारच वाढलेली आहेत. पाकिस्तानमध्ये अंतर्गत सुरक्षेच्या हिंसाचारामुळे आतापर्यंत 17 हजार, 636 हिंसाचाराच्या घटनांमध्ये, 9 हजार, 546 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.
 
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याला हालचालसुद्धा करता येत नाही. मात्र, चीन आणि तुर्कस्तान करत असलेल्या मदतीमुळेच पाकिस्तानची लढण्याची क्षमता टिकून आहे. ही क्षमता कमी करण्याकरिता आपल्याला दीर्घकाळ ‘मल्टी डोमेन युद्ध’ राबवावे लागेल आणि त्याकरिता आधी भारतीयांना तयार राहावे लागेल. समाजमाध्यमांमध्ये कान आणि डोळे बनून देशद्रोही पोस्टवर प्रत्येकाने लक्ष ठेवावे आणि त्याची लिंक सायबर पोलिसांकडे पाठवून, त्यांना पकडण्यामध्ये जरूर मदत करावी.
 
निष्कर्ष
 
आपण येणारे दिवस आपली तंत्रक्षमता, युद्धक्षमता अधिक भक्कम करण्यासाठी वापरले पाहिजे. पाकिस्तान केवळ दहशतवादाच्या मार्गानेच नव्हे, तर अमली पदार्थ, बनावट चलन, आपल्या नागरिकांची भारतात बेकायदेशीर घुसखोरी आदी माध्यमातूनही भारताचे नुकसान करत आहे. या सर्व गोष्टी थांबवणे हे आपल्यापुढचे खरे आव्हान असून, त्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे. पाकिस्तान हा एक कॅन्सर आहे. त्यावर आपण आता ‘केमोथेरपी’ केली आहे. मात्र, ही ‘केमोथेरपी’ पुन्हा पुन्हा करावी लागेल. हा कॅन्सर समूळ नष्ट करायचा असेल, तर पाकिस्तानची सामरिक क्षमता कमी करण्यासाठी पाकिस्तानचे तीन-चार तुकडे करणे हाच दीर्घकालीन उपाय आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या नव्या लष्करी धोरणाचे प्रतिबिंब आहे, जिथे संकोच नाही, स्पष्टता आहे. पाकिस्तानच्या दहशतवादावर रोख लावणारे हे पाऊल सर्वांत निर्णायक ठरेल. भविष्यात ही कारवाई संरक्षण क्षेत्रात नवे धोरण व बदल घडवून आणणारा मैलाचा दगड ठरेल.