ज्योती मल्होत्रा. भारतातील एक ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर. सोशल मीडियावर ज्योतीचे लाखों फॉलोअर्स. मात्र, याच ज्योती मल्होत्रा हिला आता देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनांशी संबंध असल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आलीये. तिच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचाही आरोप आहे. एकीकडे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असताना ज्योती मल्होत्रा या महिलेचे हे कृत्य उघडकीस आले आहे. मात्र, ही ज्योती मल्होत्रा नेमकी कोण आहे? ती पाकिस्तानच्या संपर्कात कशी आली? आणि ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी कसं काम करत होती? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
ज्योती मल्होत्रा ही भारतातील एक लोकप्रिय युट्यूबर असून ती हरियाणा येथील रहिवाशी आहे. 'ट्रॅव्हल विथ जो' या नावाने तिचं यूट्यूब चॅनल आहे, तर सोशल मीडियावर तिचे १ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने आपल्या अकाऊंटवर पाकिस्तानील प्रवासाचे अनेक व्हिडिओ आणि रील्सदेखील पोस्ट केल्या आहेत. तसेच ज्योतीच्या इन्स्टाग्राम हँडलवरसुद्धा पाकिस्तानशी संबंधित अनेक रील्स आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये ज्योती मल्होत्रा हिने कमिशनद्वारे व्हिसा मिळवला आणि पाकिस्तानला भेट दिली. यावेळी पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी अहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशी तिची ओळख झाली. दरम्यान, तिने दानिशचा मोबाईल नंबर घेतला आणि नंतर त्याच्याशी बोलू लागली. १३ मे २०२५ रोजी भारत सरकारने दानिशला हेरगिरीत सहभागी असल्याबद्दल पर्सोना नॉन ग्राटा घोषित केल्याचीही माहिती आहे.
पुढे ज्योती दोनदा पाकिस्तानला गेली जिथे दानिशच्या सांगण्यावरून, ती अली अहवानला भेटली. त्यानेच तिच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली. त्यानंतर त्याने पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांशी तिची ओळख करून दिली. अशा प्रकारे ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या इतर एजंट्सच्यासुद्धा संपर्कात आली. भारतात परतल्यानंतर ती व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, स्नॅपचॅट यासारख्या सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे या एजंट्सच्या संपर्कात राहिली. याच काळात तिने पाकिस्तानला संवेदनशील माहितीदेखील शेअर केली. एवढंच नाही तर सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा सादर करण्यासाठी तिचा वापर केला जात असल्याचा आरोप केला जातोय.
सुत्रांच्या माहितीनुसार, भारतात परतल्यानंतरही ज्योती पाकिस्तानी एजंट्सच्या सतत संपर्कात होती आणि अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून ती भारताशी संबंधित माहिती त्यांना शेअर करत होती. ती पाकिस्तानातून परतल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थांनी तिच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवली. तिचे आर्थिक व्यवहार, ती कुणाच्या संपर्कात आहे या सगळ्यांवर नजर ठेवण्यात आली. याबाबत पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर अखेर आता तिला अटक करण्यात आलीये.
सध्या ज्योती मल्होत्रा हिची सखोल चौकशी करण्यात येत असून तिच्यासोबत आणखी मोठे रॅकेट आहे का? याबाबतचा तपास सुरुये. याशिवाय हरियाणा पोलिसांनी आतापर्यंत आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागात राहणाऱ्या सहा जणांना अटक केलीये.
हे प्रकरण केवळ ज्योती मल्होत्रापुरतंच मर्यादित नसून पोलिसांनी आणखी एका प्रमुख महिला आरोपीला अटक केलीये. गजाला असं या महिलेचं नाव असून ३२ वर्षीय गजाला ही पंजाबमधील मालेरकोटला येथील विधवा आहे. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी गजाला व्हिसाकरिता अर्ज करण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली. तिथे ती दानिशला भेटली आणि त्याच्यासोबत काही माहिती शेअर केली. त्यानंतर दानिशने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिल्याचीही माहिती आहे. पुढे हळूहळू दानिशने गजाला हिला पैसे पाठवण्यासही सुरुवात केली.
मात्र, ज्योती असो वा गजाला त्यांनी अशा प्रकारे देशविरोधी कृत्य करण्यामागे नेमकी काय कारणं असावी? त्यांच्याव्यतिरिक्त या कामात आणखी मोठे रॅकेट आहे का? यात अशा आणखी किती ज्योती आणि गजाला आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं हे तपासानंतर पुढे येईलच.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....