‘बंजारा’ हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर एक भटकंती करणारा, सतत नवनवीन वाटा धुंडाळणारा, स्थिर न राहणारा आणि प्रवासातच जगणारा एक चेहरा तरळतो. हाच भाव ‘बंजारा’ चित्रपट आपल्यासमोर मांडतो, एक हळव्या आठवणींनी गुंफलेला, मैत्रीच्या नात्याने सजलेला आणि आत्मशोधाच्या प्रवासातून उलगडणारा अनुभव...
चित्रपटाची सुरुवात होते एका साध्या, पण जिव्हाळ्याच्या प्रसंगाने. क्रिकेटच्या अंतिम सामन्यानिमित्ताने चार वर्षांनी एकत्र आलेले तीन जिवलग मित्र. समीर (भरत जाधव), जो आता एक क्रिकेट प्रशिक्षक आहे, विवेक (सुनील बर्वे), एक संवेदनशील चित्रपट दिग्दर्शक, आणि अविनाश (शरद पोंक्षे), एक उद्योगपती समंजस, विचारवंत व्यक्तिमत्त्व. एका सामन्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या मित्रांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा जुन्या आठवणींची चमक असते. त्यांच्या हास्य फुललेल्या संवादांतून एक गोष्ट उलगडत जाते, 22 वर्षांपूर्वीची एक अनपेक्षित ‘रोड ट्रिप.’ ती ट्रिप कोणत्याही नियोजनाचा भाग नव्हती. ना कोणती बुकिंग्स, ना प्लॅनिंग, ना ध्येय. फक्त एक स्फूर्ती होती, एक ओढ होती आणि ती होती जगायला, अनुभवायला आणि आठवणी निर्माण करायला. ही ट्रिप होती हसण्याची, रुसव्या-फुगव्याची, तर कधी मनात दडलेले विचार बोलून दाखवण्याची. पण, या ट्रिपचा खराखुरा उद्देश समजतो, तो समीरच्या आजोबांच्या एका अपूर्ण इच्छेच्या निमित्ताने.
समीरचे आजोबा हे एक हट्टाळलेले ट्रेकर. 75 वर्षे वयानंतरही डोंगर-दर्या पायाखाली घालणारे, प्रत्येक ठिकाणी शिवशंकराचं मंदिर शोधणारे आणि प्रत्येक यात्रा ही आत्मानुभवाची संधी मानणारे. त्यांनी आयुष्यात जवळपास सगळी अशी मंदिरे पाहिली होती, पण शेवटपर्यंत एक जागा पाहायची राहिली, जी आजोबांनी स्पष्टपणे सांगितली नव्हती, पण ती जागा आणि त्या जागेवर न जाण्याची खंत मनात खोलवर बाळगलेली होती. आजोबांच्या निधनानंतर समीरला हे जाणवतं आणि तो आपल्या मित्रांसह ठरवतो, आजोबांची ही शेवटची इच्छा पूर्ण करायची. इथून सुरू होतो त्यांचा खरा प्रवास. सुरुवातीला उद्दिष्ट ठरलेलं नसतं, पण मार्गक्रमण करताना अनेक निसर्गरम्य आणि भावनिक वळणं घेत ते पोहोचतात सिक्कीममध्ये, एक असं ठिकाण जिथे शांततेला स्पर्श करता येतो आणि निसर्गाशी संवाद साधता येतो. सिक्कीम हे फक्त एक पर्यटनस्थळ नसून, त्या ठिकाणातील शिवशंकराचं मंदिर हे आजोबांचं स्वप्न पूर्ण करणारं ठिकाण ठरतं आणि इथेच त्यांच्या प्रवासाला पूर्णत्व लाभतं, केवळ भौगोलिक दृष्टिकोनातून नाही, तर भावनिक, आध्यात्मिक आणि आत्मिक दृष्टिकोनातूनही.
चित्रपटातील कथा एका सहलीप्रमाणे वाटते आणि का वाटू नये? याचं उत्तर म्हणजे चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक कलाकाराचा अभिनय प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. समीर जोशी ही व्यक्तिरेखा म्हणजे एक भावनिक धागा आहे, जो मित्रांनाही एकत्र ठेवतो आणि कथेलाही एक स्पष्ट दिशा देतो. भरत जाधव यांनी या भूमिकेत आपल्या संयत अभिनयशैलीने एक वेगळाच ठसा उमटवला आहे. त्यांच्या डोळ्यांतून झळकणारी आजोबांबद्दलची आत्मीयता आणि मैत्रीबद्दलचा आदर प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसतो. त्यांचा अभिनय केवळ संवादांपुरतं मर्यादित राहात नाही, तर त्यांच्या शांत क्षणांतूनही फार व्यक्त होताना दिसतो. विशेषतः जेव्हा तो आजोबांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत “काहीही झालं तरी आजोबांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि ती मी करणारच,” हे सांगताना त्याचे मित्र त्याच्यासोबत यायला तयार होतात. अशा प्रकारे ट्रेकिंगवेड्या आजोबांच्या आठवणीतून सुरू होणार्या या प्रवासाचा केंद्रबिंदू भरत जाधवने अत्यंत संयमित आणि भावनिक ताकदीने रंगवला आहे. त्याच्या मित्रांमधला एक विवेक दिक्षित जादुई नगरीत स्वतःचं अस्तित्व शोधणारा म्हणजेच एक संवेदनशील आणि थोडासा वास्तववादी दिग्दर्शक, जो आयुष्याकडे तत्त्वज्ञानाच्या नजरेने पाहतो.
सुनील बर्वेंच्या आवाजातील गांभीर्य, त्यांच्या संवादफेकीतील स्थिरता आणि मनातल्या आठवणींना चित्रित करताना चेहर्यावर उमटणारे एक हलके स्मित, या सगळ्यामुळे विवेकचं पात्र खर्या अर्थाने सजीव होतं. या मैत्रीच्या त्रिकुट मैफिलीत बिनधास्त वावरणारा अविनाश अग्निहोत्री. शरद पोंक्षे यांनी साकारलेला अविनाश हा जणू त्या जुन्या गटातील एक हळवा, थोडासा संवेदनशील पण मनस्वी मित्र. त्याच्या बोलण्यातील तजेलदारपणा आणि कधीकधी फुलणारी आंतरिक वेदना हे सगळं शरद पोंक्षे यांनी मोठ्या ताकदीनं साकारलं आहे. त्याच्या संवादांमध्ये एक असा सहजपणा आहे, जो प्रेक्षकाला नकळत आपल्या मित्राची आठवण करून देतो.
अभिनयाचा एक वेगळा पैलू साकारणारे अभिनेते संजय मोने. ’बंजारा’ चित्रपटात संजय मोने यांनी साकारलेली भूमिका ही एक साधी सरळ व्यक्तिरेखा वाटते, पण जसजशी कथा उलगडत जाते, तसतसं तिच्यातलं गूढ आणि सूचक स्वरूप जाणवायला लागतं. ते केवळ एक पात्र नाहीत, तर जणू नियतीचा एक संदेश आहे, जो या तिघा मित्रांच्या मार्गावर अधूनमधून येतो, त्यांना सावध करतो आणि त्यांना पुढे जाण्यासाठी दिशा दाखवतो. या पात्राचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे, त्याचा स्थिरपणा आणि संवादामागे दडलेलं गूढ. “रस्ता सोपा नाही; पण तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे. त्याकरिता हा मार्ग योग्य असेल,” अशा स्वरुपाच्या वाक्यांतून ते ना सरळ सल्ला देतात, ना धोक्याचा थेट इशारा; पण त्यांच्या नजरेत, आवाजात आणि वागण्यातून एक स्पष्ट सूचना जाणवते. संजय मोने यांनी हा संयम आणि सूचकतेचा अभिनय कमालीच्या नेमकेपणाने साकारला आहे. त्यांचं पात्र हे जणू या प्रवासातील एक ‘टर्निंग पॉईंट’ आहे.
‘बंजारा’ या चित्रपटातून स्नेह पोंक्षे याने दिग्दर्शनात आपलं पहिलं पाऊल टाकलं असलं, तरी त्याच्या कामातली परिपक्वता आणि संवेदनशील दृष्टिकोन सहज जाणवतो. शिवलिंगापर्यंत आजोबांच्या अस्थी पोहोचवण्यासाठी निघालेल्या या चौघांना वाटेवर एक बाबा दोन मार्ग दाखवतो, एक सोपा, एक कठीण. सोपा वाटतो म्हणून त्यांनी घेतलेला ’शॉर्टकट’ मात्र त्यांच्या आयुष्यात एक विलक्षण अनुभव घेऊन येतो. कारण, त्या रस्त्यावर त्यांना एकच माणूस वेगवेगळ्या रूपांत दिसतो. तो माणूस कोण होता? आजूबाजूला वस्ती नसतानाही तो माणूस तिथे कसा? या प्रश्नांची उत्तरे न सापडल्यामुळे शेवटी ते मागे फिरतात आणि दुसर्या दिवशी दुसरा मार्ग निवडतात. पुढे काय होतं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हालाही या ‘बजार्यां’सोबत तो प्रवास अनुभवावाच लागेल. कारण, नसेल विकल्प तुझ्या ‘शिवा’य!
दिग्दर्शक : स्नेह पोंक्षे
कलाकार भरत जाधव, शरद पोंक्षे, सुनील बर्वे
सक्षम कुलकर्णी, आदित्य धनराज, स्नेह पोंक्षे
रेटिंग 3 स्टार