मुंबई : आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहलयात वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचसोबत लहान मुलांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १८ मे रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहलयात आंतरराष्ट्रीय वस्तूसंग्रहालय दिनानिमित्त काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी कथाकथनाचा विशेष प्रकार ' दास्तानगोई 'चे सादरीकरण
अक्षय शिंपी आणि धनश्री खांडकर करणार आहेत. मयूर वैद्य आपल्या नृत्याचे सादरीकरण यावेळी करणार आहेत. त्याच बरोबर उत्तरा चौसळकर पारंपरिक गीतांचा नजराणा सादर करणार आहेत.
कला आणि हस्तकला उपक्रमांची मेजवाणी!
संपूर्ण दिवसभरात, लहान मुलांसाठी काही विशेष सर्जनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . सकाळी ११ वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय येथे या उपक्रमाला सुरुवात होईल. सदर उपक्रम निशुल्क असून, मोठ्या संख्येने पालकांनी तथा विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यामध्ये कावड सादरीकरण, टॅक्सिडर्मीचे प्रात्यक्षिक, प्राचीन दगडी उपकरणांचे प्रात्यक्षिक, प्राचीन लिपींची तोंडओळख, ब्लॉक प्रिंटिंग, तसेच पुरातत्व उत्खननाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे.