मुंबई, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक येत्या दि. ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या पदासाठी गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची नावे चर्चेत आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार राजेश कुमार यांचा नंबर असला, तरी ते ऑगस्ट २०२५ मध्ये निवृत्त होणार असल्यामुळे, अवघ्या दोन महिन्यांकरिता त्यांना हे पद मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गगराणी या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांचा कार्यकाळ मार्च २०२६ पर्यंत शिल्लक असल्याने दीर्घकाळ काम करण्याची संधी त्यांना मिळेल.
मुख्य सचिव हे प्रशासनातील सर्वात मोठे पद असल्याने राज्य सरकारची धोरणे आणि निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका निर्णायक असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना आता १५० दिवसांचे लक्ष्य आखून दिले आहे. त्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मुख्य सचिवांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गगराणी यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयांसह प्रशासनातील अनुभव लक्षात घेता त्यांची निवड जवपास निश्चित मानली जात आहे.