पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला. तरीही चीन, तुर्कीए, अजरबैजानसारखे काही देश पाकिस्तानच्या मागे उभे राहिले. त्यांनी पाकला लष्करी मदतही केली. त्यामुळे साहजिकच या देशांविरोधात भारतातही संतापाची लाट उसळली असून, या देशांशी व्यापार-पर्यटनावरील बंदीची मागणी तीव्र झाली आहे.
आम्ही कठीण काळात नेहमीच पाकिस्तानसोबत उभे राहू. युद्धविराम झाला याबद्दल आम्ही समाधानी आहोत. अन्य समस्यांवर दोन्ही देश तोडगा काढतील, इन्शाअल्ला... पाकिस्तानच्या चांगल्या-वाईट काळात सोबत राहणार्या एका भावाची भूमिका आम्ही निभावतो,” अशा आशयाचे ‘ट्विट’ तुर्कीएचे राष्ट्राध्यक्ष रसीप तैय्यब एर्दोगान यांनी नुकतेच केले. एवढेच नाही तर तुर्कीएने पाकिस्तानला क्षेपणास्त्रे, ड्रोनचा भारताविरोधात पुरवठा केला आणि युद्धनौकाही कराचीनजीक तैनात केली. म्हणा, तसेही पाकिस्तान आणि तुर्कीएचे ‘उम्मा’वर आधारित सख्य तसे सर्वश्रुत. तरीही 2023 साली तुर्कीएतील भीषण भूकंपावेळी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ राबवित, तुर्कीएला सर्वोपरि मदत केली होती. पण,एर्दोगान यांनी मदतीला न जागता, कृतघ्नपणा दाखवित पाकच्या मांडीलाच मांडी लावली. त्यामुळे यापुढे शत्रूचा मित्र तो आपलाही शत्रू, अशीच भूमिका भारतही घेईल. पण, पाकिस्तानची दाढी कुरवाळणारा तुर्कीए हा एकमेव देश नाही. मुस्लीम राष्ट्राला मदत म्हणून अजरबैजाननेही अशीच भूमिका घेतली.
मग काय, या दोन्ही देशांविरोधात भारतीयांचेही पित्त खवळले आणि काही पर्यटन कंपन्यांनी या देशांसाठीचे सहलींचे बुकिंगही रद्द केले. आता या दोन्ही देशांच्या भारताशी असलेल्या व्यापारावर एक नजर टाकूया. एप्रिल ते फेब्रुवारी 2024-25च्या आकडेवारीनुसार, भारत तुर्कीएला एकूण 5.2 अब्ज डॉलर्सची निर्यात करतो. 2023-24 साली ही निर्यात 6.65 अब्ज डॉलर्स इतकी होती, तर अजरबैजानला एकूण 86.07 दशलक्ष डॉलर्स इतकी निर्यात यंदाच्या आर्थिक वर्षात करण्यात आली. अर्थात, ही फक्त भारताच्या एकूण निर्यातीच्या दीड टक्के इतकीच. त्यामुळे भारतातून होणार्या निर्यातीवर अवलंबून असणारे हे दोन्ही देश पाकला जवळ करण्याच्या नादात भारताशी व्यापार गमावण्याच्या छायेत आहेत. याचा दणका एव्हाना दोन्ही राष्ट्रांना देण्यास भारतीयांनीही सुरुवात केलेली दिसते.
भारतातील पर्यटन कंपन्यांनी अजरबैजान आणि तुर्कीएतील नव्याने बुकिंग घेण्यास सक्त मनाई केली. त्यात भारत-पाकिस्तान युद्धाचे सावट असल्याने पर्यटकांनी जम्मू-काश्मीरऐवजी आता पूर्वोत्तर राज्यांना अधिक पसंती दिल्याचे दिसते. ‘आयपीएल’ पुन्हा सुरू झाल्यानंतर पर्यटनावर होणार्या पूर्वीचा परिणाम आता काहीसा कमी होताना दिसणार आहे. क्रीडा पर्यटन बदलेल्या वेळापत्रकानुसार आता बंगळुरु, जयपूर, मुंबई, दिल्ली, लखनौ, अहमदाबाद या क्षेत्रात जास्त होताना दिसेल. मात्र, पाकिस्तानी खेळाडूंना स्वतःच्या देशातच खेळण्यास भीती वाटते. त्यामुळे त्यांनी इतर मैदानांची चाचपणी केली होती, तर त्याचे सामने ‘युएई’मध्ये खेळवण्यासही नकार देण्यात आला. आम्ही फक्त ‘बीसीसीआय’ आणि जय शाह यांच्याशी बांधील आहोत, असा स्पष्ट संदेशही पाकिस्तानला मिळाला.
दुसरीकडे तुर्कीए आणि अजरबैजानवर पर्यटन कंपन्यांनी बहिष्काराची सुरुवात केली आहे. इथल्या सर्व नव्या बुकिंग थांबविण्यात आल्या आहेत. देशाच्या शत्रू राष्ट्राला मदत करणार्यांविरोधात प्रचंड चीड कंपन्यांमध्ये आणि ग्राहकांमध्येही आहे. तुर्कीश विमानसेवा देणार्या कंपन्यांशीही आम्ही संबंध तोडत आहोत, अशी माहिती पर्यटन कंपन्यांनी दिली. यापुढे तुर्कीएतील नागरिकांना गोव्यात स्थान नाही, असा इशाराही गोव्यातील पर्यटन कंपन्या देत आहेत. यात पाकिस्तानची मदत करणार्या उझबेकिस्तान आणि अजरबैजानचेही नाव समाविष्ट करण्यात आले आहे. गरज असेल तरच या देशात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारताने पाकिस्तानी अजेंडा पसरवणार्या तुर्कीए आणि चिनी ‘एक्स’ अकाऊंटवरही देशात बंदी लादली. ‘ग्लोबल टाईम्स’ सातत्याने भारताबद्दल दुष्प्रचार करण्यात व्यस्त होते, याचप्रकारे तुर्कीचा अधिकृत सरकारी चॅनल ‘टीआरटी’ ही पाकची खोट्या प्रचाराची तळी उचलण्यात व्यस्त दिसले. त्यांनाही भारताने इशारा दिला. तुर्कीएची उत्पादने नकोच, पर्यटनही नकोच, अशी भावना आता प्रत्येक भारतीयाने घेतली. समाजमाध्यमांवर ‘बॉयकॉट तुर्कीए’ ही मोहीम अधिक जास्त प्रभावीपणे सुरू आहे.
भारतातील एकूण तीन लाख पर्यटक तुर्कीला दरवर्षी भेट देतात, तर दोन लाख लोक अजरबैजानला जातात. सध्या तीन हजार भारतीय तुर्कीत वास्तव्यास आहेत, ज्यापैकी 200 विद्यार्थी आहेत.
अजरबैजानमध्ये एकूण 1 हजार, 500 भारतीय वास्तव्याला आहेत. भारत अजरबैजानला तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ, चहा, कॉफी, तृणधान्ये, रसायने, प्लास्टिक, रबर, कागद, सिरॅमिक उत्पादने अशी एकूण 28.67 दशलक्ष डॉलर्सची निर्यात करतो, तर जनावरांचे खाद्य, कातडे इत्यादी अशी एकूण 1.52 दशलक्ष डॉलर्सची आयातही करतो. तुर्कीला इंधन आणि तेलासह इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहनांचे सुटे भाग, फार्मा उत्पादने, कापड, प्लास्टिक, रबर, लोह आणि स्टील निर्यात करतो. याची 2023-24 सालची एकूण आकडेवारी 960 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, तर ताजी सफरचंदे, सोने, भाज्या, सिमेंट, खनिज तेल इत्यादी आयात करतो. तुर्कीएशी 1973 साली झालेल्या द्विपक्षीय करारानुसार हा व्यापार सुरू आहे. शिवाय 1983 साली भारत-तुर्की व्यापार आणि तंत्रज्ञान सहआयुक्तालयाची स्थापना झाली आहे. ज्यावेळी तुर्कीवर भूकंपाचे संकट आले.
अवघ्या काही काळानंतर पहलगामहल्ल्यात जेव्हा भारतातील हिंदूंना त्यांचा धर्म विचारून ठार करण्यात आले, त्यानंतर झालेल्या दोन देशांच्या संघर्षात आज तुर्कीए स्वतंत्रपणे पाकिस्तानच्या पाठिशी उभा आहे. भारतानेही हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बॉलिवूड कलाकारांचाही स्वतंत्र राबता या देशात कायम असतो. तिथे होणार्या चित्रीकरणावरही बंदी घालण्याचा विचार व्हायला हवा. तिथल्या टीव्ही शोज् आणि सिनेमांवरही भारतात बंदी आणणे गरजेचे आहे. व्यापारासाठी नवा मित्र शोधण्याची गरज आहे. पण, तो पाकिस्तानचा भाईजान नको, त्याला आम्हीच अद्दल घडवू, असा रोख भारतीय कंपन्यांचाही सध्या दिसून येतो.
‘इज माय ट्रीप’चे सहसंस्थापक प्रशांत पीट्टी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तर स्पष्ट इशाराच दिला आहे. तुर्कीएतील पर्यटन 22 ते 33 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. याचा विचार केला, तर तुर्कीला एकूण तीन हजार कोटींचा फटका बसू शकतो, अशी शक्यता आहे. आता युद्ध फक्त सीमेवर नव्हे, तर प्रत्येक स्तरावर लढले जात आहे, त्याचेच हे उदाहरण!