मुंबई : 'द काश्मीर फाईल्स' आणि 'द ताश्केंट फाईल्स' चित्रपटांचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडवर थेट टीका केली आहे. मोठ्या बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक हे सुपरस्टार्सच्या वागणुकीला कंटाळले असूनही त्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्याची कोणाचीच हिंमत नसल्याचं अग्निहोत्रींनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांचा रोख विशेषतः अभिनेता रणबीर कपूरकडे होता, ज्याच्यावर ‘अॅनिमल’ या वादग्रस्त चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली, मात्र तरीही त्याचं संरक्षण केलं गेलं.
डिजिटल कमेंटरी या प्लॅटफॉर्मवरील मुलाखतीत बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, "यांची औकातच नाही रणबीरबद्दल काही बोलायची. हिंमत असेल तर बोलून दाखवून दाखवा. कुठल्या निर्माता-दिग्दर्शकाला तुम्ही ओळखता जे या कलाकारांची पाठीमागे बदनामी करत नाहीत? पण समोरासमोर कोणी काही बोलत नाही. मग अशा लोकांना सगळं भोगावं लागतं."
"पुन्हा द्या मग त्यांना १५० कोटी, सडलेली अभिनय करण्यासाठी. मी बॉलिवूड सोडलं कारण ही मंडळी स्वतःचं भविष्य या स्टार्सच्या पायाशी बांधून ठेवतात," असंही त्यांनी स्पष्ट केलं. अग्निहोत्री म्हणाले की त्यांचा राग खऱ्या स्टार्सवर नाही, तर अशा लोकांवर आहे जे स्वतःला स्टार समजतात पण प्रत्यक्षात त्यांनी काही विशेष साध्य केलेलं नसतं.
या पार्श्वभूमीवर अग्निहोत्रींनी ‘अॅनिमल’ या चित्रपटावर झालेल्या टीकेचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना लोकांनी टीकेचा सर्व भार झेलायला लावला, तर रणबीर कपूरला बऱ्याच अंशी सोडलं.
संदीप वांगा यांनीही ‘गेम चेंजर्स’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलेपणाने बोलताना सांगितले की, "चित्रपटाविषयी प्रचंड टीका झाली, पण सगळ्यांनी रणबीरला ‘ब्रिलियंट’ म्हटलं. मी रणबीरचा हेवा करत नाही, पण हे समजत नाही की त्याचं सगळ्यांनी कौतुक केलं आणि लेखक-दिग्दर्शकावर सर्व टीका आली. कारण स्पष्ट आहे – सर्वांना रणबीरसोबत काम करायचं आहे. जर त्यांनी रणबीरवर टीका केली, तर संबंध बिघडतील. पण मी नवखा असल्यामुळे माझ्यावर बोलणं सोपं आहे."
या सर्व विधानांतून एक बाब ठळकपणे पुढे येते की, बॉलिवूडमध्ये अनेक मोठे चेहरे आणि निर्माता-दिग्दर्शक हे खाजगीत एकमेकांवर टीका करतात, पण इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित स्टार्सविरोधात उघडपणे बोलण्याची कोणाचीच तयारी नसते. विवेक अग्निहोत्री यांच्या या टीका केवळ एखाद्या कलाकाराविरुद्ध नसून, बॉलिवूडमधील स्टारडमवर अवलंबून असलेल्या संपूर्ण व्यवस्थेवर आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.