शाश्वत कृषीच्या दिशेने...

    14-May-2025
Total Views |
 
sustainable agriculture
 
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा. मात्र, अन्न ही गरज मानवी विकासाच्या प्रदीर्घ कालखंडात आजही तितकीच महत्त्वाची. कृषी हाच या गरजेच्या पूर्ततेचा मुख्य स्रोत आहे. आजमितीला आधुनिकतेच्या नावाखाली विक्रमी उत्पादन घेत केलेली शेती मानवाचे आवश्यक पोषण करण्यास अक्षम आहे, त्यासाठी शाश्वत कृषी हाच एक पर्याय आहे. त्याविषयी सविस्तर...
 
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, असे मानले जाते. यातील वस्त्रे आणि निवारा यांच्या पूर्तीकरिता तंत्रज्ञानाची आवश्यकता अनिवार्यच. किंबहुना, अनेकविध प्रकारची गुंतागुंतीची तांत्रिक साधने आणि प्रक्रिया वापरल्याशिवाय, आज आपण वापरत असलेली वस्त्रे आणि घरे निर्माणच होऊ शकत नाहीत. अन्ननिर्मिती मात्र अजूनही जगात अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनेच होते. शेती हा मानवी प्रगतीचा एक प्रमुख टप्पा मानला जातो आणि विशेष तांत्रिक साधने आणि उपकरणे नसतानाही शेती करता येते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दिशा कोणती असावी, याचा विचार मूलभूत मानवी गरजांच्या दृष्टीने करताना, स्वाभाविकपणे वस्त्रे आणि निवारा यांपेक्षा भिन्न स्थान अन्नाच्या गरजेचे आहे. दुसरे पाहता वस्त्र आणि निवारा या गरजा संस्कृती असलेल्या प्रगत मानवाच्या आहेत. त्याउलट अन्न ही मात्र मानव प्राण्याची जीवशास्त्रीय आदिम गरज आहे. सांस्कृतिक भान जागृत झालेल्या मानवाने अन्नाकडे आणि त्याच्या निर्मितीस आवश्यक कृषिकडे काय नजरेने पाहावे, याचा विचार म्हणूनच आवश्यक आहे.
 
फळे, कंदमुळे आणि शिकार यांवर उदरनिर्वाह असणार्‍या मनुष्यप्राण्याने साधारण दहा हजार वर्षांपूर्वी कृषीस आरंभ केला. निसर्गात स्वाभाविकपणे उगवणार्‍या वनस्पती मारून तिथे मानवास खाण्यायोग्य वनस्पतींची लागवड करणे, तिची जोपासना करणे आणि पीक तयार झाल्यावर ते कापून अन्न म्हणून वापरणे, या प्रक्रिया ज्याला पूर्णपणे नैसर्गिक म्हणता येतील अशा नाहीत. एकप्रकारे ती निसर्गात केलेली ढवळाढवळच आहे. परंतु, ती निसर्गाच्या विपरीत नाही. निसर्गाच्या चक्राचा अभ्यास करून त्याचा आपल्याला अनुकूल वापर करून घेत, निसर्गातून आपल्याला हवे ते मिळवणे असा प्रयत्न त्यात आहे. शेतीचा आरंभ हा मानवी समाजजीवनातील महत्त्वाचा टप्पा ठरला. कारण, शेती करण्यासाठी स्थैर्य आवश्यक होते. त्यामुळे फिरत्या टोळ्या स्थिर झाल्या आणि त्यातून उद्भवलेल्या मोठ्या मानवसमूहांच्या सहजीवनातून संस्कृती उदयास आल्या. अधिकाधिक विशाल होत जाणार्‍या मानवी समाजाच्या व्यवहारांचे नियंत्रण करण्यासाठी, विविध व्यवस्था निर्माण झाल्या. त्यांच्या संचालनासाठी मनुष्यबळाची गरज निर्माण झाली. आपल्या परिवारासाठी करण्याची शेती, आता अधिकचे उत्पादन करण्यास वापरली जाऊ लागली. जिचा उपभोक्ता हा ‘अ-कृषक’ असा सर्व वर्ग होता. केवळ स्वतःच्या अन्ननिर्मितीसाठी असणारी कृषी, या टप्प्यावर एक व्यवसाय आणि अर्थार्जनाचे साधनही बनली.
 
भारतीय कृषी विचार हा यापूर्वी उल्लेख केलेल्या एकंदर निसर्ग विचाराशी मिळताजुळता असाच. जगातील पहिली भातशेती ही उत्तर प्रदेशमध्ये केली असल्याचे पुरावे सापडले आहेत. ‘भूमाता’ ही व्यापक संकल्पना जरी संपूर्ण धरित्रीस लागू असली, तरी प्रत्येक शेतकर्‍यासाठी आपला शेतीचा तुकडा हा त्या अमूर्त संकल्पनेचे प्रत्यक्ष स्वरूप होते. आमच्या शेतीसाठी उत्तम पाऊस होवो आणि नद्या भरभरून वाहोत, अशा अर्थाच्या वेदांतील ऋचा गायल्या जात. शेतीसाठी नांगरणी करण्यापूर्वी भूमीचे पूजन करण्याची पद्धत होती. पीक घेतल्यानंतर जमिनीचे जे पुनर्भरण आवश्यक असते, ते नैसर्गिक पद्धतीने होऊ दिले जात होते. पिके ही ऋतुचक्राशी अनुरूप अशीच घेतली जात. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असे की, अनेक उत्सव हे कृषिकार्यातील विविध टप्प्यांशी निगडित होते. बीजारोपण हे शुभ दिवस ठरवून होत असे आणि दसरा, पोंगलसारखे मोठे सणसुदीचे दिवस चांगले पीक आल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ साजरे होत.
 
शेतीसाठी महत्त्वाच्या अशा पशुधनाबद्दलही प्रेमाची आणि कृतज्ञतेची भावना होती आणि या भावनेचे प्रकटीकरण म्हणून बैलपोळ्यासारखे सणही होते. शेतीव्यवस्थेच्या भोवताली उभ्या राहिलेल्या पूरक नैसर्गिक रचनेचाही आदर होता आणि त्यासाठी नागपंचमीसारख्या सणांचे वेगळेच महत्त्व होते. थोडक्यात शेती ही बाकीच्या सर्व निसर्गापासून फटकून आपल्या मालकीच्या तुकड्यातून हवे ते उत्पन्न घेणे अशी नसून, निसर्गाशी तादात्म्य राखून स्थानिक सृष्टीचक्रास कोणताही धक्का न लावता शक्य ते उत्पन्न घेणारी होती.
 
निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणार्‍या आणि निसर्गचक्राशी एकात्मता सांगणार्‍या शेतीपद्धतीपासून आपण आजच्या तंत्राधारित शेतीपर्यंत कसे पोहोचलो आणि ही दिशा मानवी समाजासाठी योग्य आहे की अयोग्य हे जाणून घेणे, शाश्वत कृषीचे उद्दिष्ट साधायचे असल्यास महत्त्वाचे आहे. किंबहुना शाश्वत कृषी या शब्दप्रयोगात नेमके काय अपेक्षित आहे, ते किमान ढोबळमानाने निश्चित केल्याशिवाय लक्ष्याच्या दिशेने प्रवास करणे अशक्य आहे. मानवी समाजाच्या प्रगतीमध्ये शेतीसंदर्भात दोन महत्त्वाच्या टप्प्यांचा विचार आवश्यक आहे. पहिले म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट. आज जागतिक मानवी लोकसंख्या ही सात-आठ अब्जापर्यंत पोहोचलेली आहे. हा आकडा प्रचंड आहेच, पण त्याच्या वाढीचा वेगही कमी होताना फारसा दिसत नाही. प्राचीन काळीही नगराची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्यास, त्यांना वसायला आणि कसायला नवीन जमीन उपलब्ध करून दिली जात असे. त्याकरिता जंगले मोकळी करून जमीन लागवडीखाली आणणे हे रूढ होते. आताच्या प्रचंड लोकसंख्येला पोसायला संपूर्ण पृथ्वी लागवडीखाली आणली तरी पुरेल का? अशी शंका कधीकधी येते. दुसरा टप्पा म्हणजे कृषी आधारित व्यवसाय करणार्‍यांचे समाजातील घटते प्रमाण. जसजशी समाजव्यवहारांची व्यामिश्रता वाढत गेली, तसतशी विविध संकल्पनात्मक, तंत्रज्ञानात्मक आणि प्रशासकीय व्यवहारांत कार्यरत असणार्‍या व्यक्तींची संख्या समाजात वाढत गेली. स्वाभाविकपणे कृषिक्षेत्रात कार्यरत असलेल्यांचा टक्का घटत गेला. या दोन्ही घटकांचा परिणाम म्हणून दर एकरी अधिकाधिक उत्पन्न हे कमीत कमी मानवी श्रमांच्या वापरातून निर्माण व्हायला हवे, अशी आवश्यकता निर्माण झाली. एकदा कृषिक्षेत्राचे उद्दिष्ट म्हणून हे निश्चित झाले की, त्यापाठोपाठ अनेक आधुनिक बदल अपरिहार्यपणे येतच राहतात.
 
जमिनीत उगवणारे धान्य आणि तिथेच उगवणारे तण यांची एक नैसर्गिक स्पर्धा असते. त्या तणाला पूर्णपणे न मारता धान्याची वाढ अधिक जोमदारपणे होईल, इतकेच दाबले तर धान्य आणि तण यांच्याभोवतीची नैसर्गिक परिसंस्थाही टिकून राहते. मात्र, यांत्रिक ट्रॅक्टर वापरून खोलवर नांगरणी केल्यास, या परिसंस्थेचा नैसर्गिक समतोल बिघडून जातो. सेंद्रिय खते वापरल्यास जमिनीचा पोत सुधारण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो, तर रासायनिक खतांनी आज उत्तम पीक येते. पण, जमीन हळूहळू नापीक होत जाते. किंबहुना वर्षभरात दुबार आणि कधीकधी तिबार पिके घेण्याच्या नादात जमिनीचा कस भरून काढण्यासाठी ती काही काळ नुसतीच पडीक ठेवावी लागेल, हे भानच हरवल्यासारखे झालेले दिसते. त्याचप्रमाणे कीडनाशक औषधे सतत वापरल्याने पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीच नष्ट होते. एका अभ्यासानुसार कीडनाशक औषधे वापरल्याने येणारे उत्पन्न आणि ती न वापरल्यास येणारे उत्पन्न यात विशेष फरक असतोच असे नाही. कारण, किडी ज्या रोपांवर हल्ला करतात ती तशीही कमजोर आणि निःसत्त्व असतात आणि एकूण उत्पादनात त्यांचा विशेष हातभार नसतोच.
 
 
कृषीत वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाची आणि त्याच्या उपयोगितेची माहिती पिकांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने तर आपण पाहिलीच पण, अशा प्रकारच्या शेतीतून निर्माण झालेले अन्न ग्रहण करून आपल्याला जे विविध विकार जडतात ते पाहता, या प्रकारे उत्पादन वाढवून नेमका कोणता फायदा होतो? हे आज कळेनासे झाले आहे. रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेले अन्नधान्य सतत खाणार्‍या व्यक्तींमध्ये वाढते कर्करोगाचे प्रमाण, आता सर्वत्र दृष्टोत्पत्तीस पडते आहे. त्याचबरोबर आपल्या नैसर्गिक हवामानाशी प्रतिकूल असे अन्न सतत खाऊन, हृदयरोग आणि मधुमेहासारखे विकार तरुण वयातच जडत आहेत. या सर्व परिणामांचे मूळ कारण म्हणजे, कृषिची कार्यक्षमता वाढवण्याच्या नादात कृषी उत्पादनाचे ग्राहक कोण आणि त्यांच्या मूळ गरजा कोणत्या याचाच विसर पडला आहे. शेतकरी आता त्यांचे पीक हे मोठमोठ्या कंपन्यांना विकण्यासाठी बनवतात; ज्या शेतमालावर विविध प्रक्रिया करून त्यापासून साठवून वापरता येतील, असे अनेक पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ कित्येक महिने साठवले जातात आणि मूळ स्रोतापासून कितीतरी अंतर दूर विकले जातात. केवळ ट्रेंड आहे म्हणून आपल्या प्रदेशाशी कोणतीही जवळीक न सांगणारे, आपल्या ऋतुमानाशी न जुळणारे पदार्थ सतत खाल्ले जाऊन जीवनचर्येशी संबंधित विकार जडतात. न्यूनतम श्रमात अधिकतम उत्पादन, उत्पादनाची मध्यस्थांमार्फत विक्री, उत्पादनाचे दिखाऊ मूल्य वाढवण्यासाठी त्यावर अनेक प्रक्रिया आणि अंतिम ग्राहकाचा उत्पादनाची जी मूळ प्रक्रिया म्हणजे शेतीशी दूरान्वयाने संबंध नसणे, हे शेतीला केवळ एक व्यवसायच बनवून ठेवते. शेतकर्‍याचे मातीशी असलेले नाते ग्राहकापर्यंत कधी पोहोचतच नाही आणि चेहराहीन उपभोग हा राक्षसी अमर्याद भोगाच्या दिशेने समाजास घेऊन जातो.
 
 
हे सर्व पाहता शाश्वत कृषीच्या दिशेने जायचे असेल, तर आपणास नेमके कुठे जायचे आहे ते ठरवावे लागेल. शाश्वत कृषी म्हणजे निसर्गचक्राशी आपली लय जुळवून घेत, समतोल कुठेही बिघडू न देता नैसर्गिकरित्या स्वाभाविक अशा अन्नपदार्थांचे उत्पादन. निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवून असे उत्पादन करणे अपेक्षित असल्याने, ते केवळ स्थानिक परिसंस्थेत नैसर्गिकपणे आढळणार्‍या पिकांचेच असू शकेल. अशा कृषिपद्धतीशी जुळवून घ्यायचे असेल, तर अन्नपदार्थांच्या वापराचा जो साचा बनला आहे तो मोडावा लागेल. अशा व्यवस्थेत शेतकरी ते ग्राहक या सर्वांचे जे चक्र आहे ते एका मोठ्या निसर्गचक्राचाच एक भाग आहे, याची जाणीव या चक्रातील सर्वच घटकांना व्हावी लागेल. विविध व्यवहारांतील विविध घटकांचे संकल्पनात्मक एकत्व जेव्हा प्रत्येक घटकाच्या अनुभूतीस येईल, तेव्हाच हिंदू चिंतनास अनुसरून शाश्वत कृषीच्या दिशेने एक समाज म्हणून आपली वाटचाल होत आहे, असे म्हणता येईल.
 
 - डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)