मुंबई : श्री शिवाजी मंदिर, दादर येथे ६ मे रोजी ३५व्या मराठी राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. या उद्घाटन सोहळ्यात सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री लीना भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेला चालना देण्याचे कार्य होत असून, यावर्षीही विविध नाट्यसंस्था आपापली सर्जनशीलता सादर करत आहेत. उद्घाटन सोहळ्याच्या वेळी मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी आपल्या मनोगतातून एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत, सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भंडारे यांनी सांगितले की, ''बालरंगभूमी ही मुलांच्या संस्कारांची शाळा आहे. पूर्वी बालनाट्य फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीपुरते मर्यादित होते, पण आज ती संकल्पना पालटली आहे. आता बालनाट्याचे प्रयोग वर्षभर ठिकठिकाणी रंगमंचावर सादर होत असतात. मात्र दुर्दैवाने, गेल्या अनेक वर्षांपासून या उपक्रमाला सरकारकडून दिले जाणारे अनुदान थांबवण्यात आले आहे. यामुळे अनेक गुणवत्तापूर्ण बालनाट्य उपक्रम आर्थिक अडचणींमुळे मर्यादित होत आहेत.''
या मागणीची गांभीर्याने दखल घेत, ॲड. आशिष शेलार यांनी तत्काळ बालनाट्य अनुदान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या जलद आणि संवेदनशील प्रतिसादाला उपस्थितांमध्ये टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली. ॲड.आशिष शेलार यांच्या निर्णयामुळे संपूर्ण बालरंगभूमी क्षेत्रात आनंदाचे आणि आशेचे वातावरण पसरले आहे. हा निर्णय फक्त आर्थिक पाठबळ देणारा नाही, तर एक सांस्कृतिक आधारस्तंभ म्हणूनही महत्त्वाचा आहे.
बालनाट्याच्या माध्यमातून निर्माण होणारी नवी पिढी जी नाटक, अभिनय, संगीत यांचा अनुभव घेते तीच पुढे मराठी रंगभूमीचे भविष्य ठरवते. त्यामुळे या उपक्रमाला मिळालेले नवसंजीवन हे संपूर्ण रंगभूमीसाठीच प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघाने आशिष शेलार यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या निर्णयामुळे बालरंगभूमीला नव्याने उभारी मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रंगभूमीवर पुन्हा एकदा कलात्मकतेचे वारे वाहू लागले असून, बालनाट्याच्या भविष्याला मिळालेली ही संजीवनी निश्चितच स्तुत्य आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.