'अलबत्या गलबत्या' लोकप्रिय बालनाटकाची सात वर्षे अविरत वाटचाल!

    13-May-2025   
Total Views | 15
 
albatya galbatya the popular childrens play has been running continuously for seven years
 
 
 
 
मुंबई : बालमनावर राज्य करणारं 'अलबत्या गलबत्या' ह्या नाटकाचा रंगभुमीवर पहिला प्रयोग १२ मे २०१८ रोजी पार पडला आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाटक आज सात वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे. याच उत्सवी क्षणात आणखी एक महत्त्वाचा टप्पा या नाटकाने गाठला असून, लवकरच 'अलबत्या गलबत्या' चा १००० वा प्रयोग सादर होणार आहे. 'अलबत्या गलबत्या' हे नाटक अद्वैत थिएटर या संस्थेच्या सादरीकरणातून प्रेक्षकांसमोर आले. नाटकाचे नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांनी बालरंगभूमीला वाहिलेली ही कलाकृती अत्यंत संवेदनशीलतेने आणि तळमळीने जपली आहे.
 
 
या नाटकाची लेखनप्रत होतकरू आणि प्रतिष्ठित नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून साकारलेली आहे. मतकरींची बालमनाची समज, कल्पनाशक्तीची झेप आणि त्यातील नाट्यरंजन 'अलबत्या गलबत्या' मधून ठळकपणे दिसून येते. या नाटकाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे. त्यांनी बालप्रेक्षकांच्या भावविश्वात रमणाऱ्या या कथेला रंगमंचावर सुंदर आकार दिला असून, त्याचं दिग्दर्शन प्रेक्षकांमध्ये खास लक्षात राहिलं आहे.
 
 
गेल्या सात वर्षांत देशभरातील विविध रंगमंचांवर हे नाटक सादर झालं असून, प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळालाय. बालरंगभूमीवर दर्जेदार आणि संस्कारक्षम नाट्य सादर करणाऱ्या या नाटकाने मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भुरळ घातली आहे. बालनाट्य केवळ उन्हाळ्यापुरतं मर्यादित न राहता, वर्षभर सातत्याने चालू राहू शकतं आणि त्याला रसिकांचं भरघोस प्रेम मिळू शकतं, हे 'अलबत्या गलबत्या' ने सिद्ध केलं आहे.
 
 
या यशामागे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत आणि तांत्रिक बाजू यांची एकत्रित मेहनत आहेच, पण त्याहीपलीकडे राहुल भंडारे यांची निर्मितीविषयक दूरदृष्टी आणि संस्कृतीविषयक बांधिलकी यामुळे हे नाटक सातत्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहिलं.
 
 
सात वर्षांचा हा प्रवास म्हणजे नुसता यशाचा उत्सव नसून, तो बालनाट्याला मिळालेल्या सातत्यपूर्ण प्रेमाचा आणि संस्कारांचा पुरावा आहे. या यशानंतर अद्वैत थिएटर, राहुल भंडारे आणि संपूर्ण टीमने सर्व रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांच्या मते, "हे नाटक आमचं असलं तरी त्याला खरी उर्जा प्रेक्षकांच्या प्रेमातूनच मिळते." 'अलबत्या गलबत्या' च्या १००० व्या प्रयोगाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीवरील या प्रेरणादायी प्रवासासाठी आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!




अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121