मुंबई : (Air India-Indigo Flight Cancelled) भारत आणि पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगोने आज मंगळवार, दि. १३ मे रोजी अनेक शहरांमधील उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशातील तणाव आणि हवाई निर्बंध व सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे.
एअर इंडियाने कोणत्या शहरातील उड्डाणे स्थगित केली?
एअर इंडियाने जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांची सर्व उड्डाणे आज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील माहिती देताना एअरलाइनने म्हटले आहे की, "सध्याच्या घडामोडी लक्षात घेता आणि तुमच्या सुरक्षिततेचा विचार करता जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तसेच तुम्हाला पुढची अपडेट देत राहू", असं म्हटलं आहे.
इंडिगोने कोणत्या शहरातील उड्डाणे स्थगित केली?
इंडिगोने श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांची सर्व उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एका निवेदनात एअरलाइनने म्हटलं की, "काही शहरातील विमानांची उड्डाणे स्थगित केल्यामुळे तुमच्या प्रवासाला कसा व्यत्यय येऊ शकतो याची आम्हाला कल्पना आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. मात्र, परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून पुढील अपडेट्सची माहिती तुम्हाला देऊ."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\