रायपूरच्या भीषण अपघातात १३ ठार! कारची ट्रेलरला धडक

    12-May-2025
Total Views |

accident in Raipur Chhattisgarh
 
रायपूर : ( accident in Raipur Chhattisgarh ) छत्तीसगडच्या रायपूर येथे भीषण अपघातात एकूण १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपघातातील गंभीर जखमींचा आकडाही मोठा आहे. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका कारने ट्रेलरला जोरदार धडक दिली, त्यात हा अपघात झाला.
 
या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, रस्त्यावर सर्वत्र मृतदेहांचा खच पडला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मृत आणि जखमींमध्ये लहान मुलांची संख्याही जास्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
रायपूरच्या सारागावजवळ येथे हा अपघात झाला. चातोद येथे जात असताना एका कारने रायपूरहून येत असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. यात काही महिन्यांच्या बाळासह जवळपास ५० लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
 
अपघातग्रस्त पुनीत साहू यांचे कुटूंबीय कारने प्रवास करत होते. एका कार्यक्रमातून परतत असताना रायपूरच्या सारागावजवळ त्यांच्या कारने एका ट्रेलरला भीषण धडक दिली. या अपघातात एक मुलगा, नऊ महिला, दोन मुली व सहा महिन्यांच्या मुलीसह १३ जणांचा जागीच दु्र्दैवी मृत्यू झाला.
 
या अपघातातील जखमींना नजीकच्या सामुदायिक आरोग्य केंद्र व रायपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. झालेल्या भीषण अपघातानंतर बराच वेळ रायपूर-बालोदाबाजार या महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.