'सनम तेरी कसम’चे दिग्दर्शक राधिका राव आणि विनय सप्रू यांचा स्पष्ट संदेश,''भारतीय प्लॅटफॉर्मने पाकिस्तानी कलाकारांशी कोणताही संबंध ठेवू नये'' सविस्तर वाचा...
मुंबई : अभिनेता हर्षवर्धन राणेने नुकतीच एक ठाम भूमिका घेतली जर सनम तेरी कसम या चित्रपटाचा सिक्वेल (भाग २) तयार झाला आणि त्यात पुन्हा पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन सहभागी झाली, तर तो स्वतः त्यात काम करणार नाही. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता चित्रपटाचे दिग्दर्शक राधिका राव आणि विनय सप्रू यांनीही पाकिस्तानातील कलाकारांवर कठोर शब्दांत टीका केली आहे आणि भारतीय प्लॅटफॉर्म्सने त्यांच्याशी कोणताही व्यावसायिक संबंध ठेवू नये, असे म्हटले आहे.
पार्श्वभूमी: ऑपरेशन सिंदूर आणि मावरा होकेनचे वक्तव्य
भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली. ही कारवाई जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झाली होती, ज्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या हवाई कारवाईवर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी टीका केली ज्यात फवाद खान, माहिरा खान आणि मावरा होकेन यांचा समावेश होता. मावरा हिने X (ट्विटर) वर लिहिले होते, "भारताने केलेला हा भ्याड हल्ला आम्ही जोरदार शब्दांत निषेध करतो… निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे… अल्लाह सर्वांचे रक्षण करो… शहाणपणाची अक्कल देवो."
दिग्दर्शकांचा ठाम विरोध
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका खास निवेदनात राधिका राव आणि विनय सप्रू यांनी म्हटले,
"दशकानुदशके भारतात निष्पाप लोकांचा बळी जाण्याचे कारण म्हणजे सीमापार दहशतवाद. हे अधिक वेदनादायक आहे की भारतात काम करून प्रेम, सन्मान व संधी मिळवलेल्या पाकिस्तानी कलाकारांनी या मुद्द्यावर पूर्ण मौन बाळगले आहे किंवा भारतविरोधात वक्तव्ये केली आहेत."
ते पुढे म्हणाले, "आम्ही सरकारच्या या निर्णयाशी पूर्णपणे सहमत आहोत पाकिस्तानी कलाकारांना एकही रुपया देऊ नये, त्यांच्यासाठी एकही क्षण वाया घालवू नये आणि कोणताही भारतीय प्लॅटफॉर्म त्यांच्यासोबत संबंध ठेवू नये. देश प्रथम नेहमीच!"
हर्षवर्धन राणे यांची भूमिका
सनाम तेरी कसम या चित्रपटाचे नायक हर्षवर्धन राणे यानेही आपल्या Instagram वर एक स्पष्ट भूमिका मांडली. त्याने लिहिले,
"या चित्रपटात काम करण्याचा अनुभव फार चांगला होता, पण सध्याच्या परिस्थितीत आणि माझ्या देशाविषयी जे सरळसरळ वक्तव्य केले गेले आहे, ते पाहता, जर मूळ कलाकार पुन्हा घेण्याचा विचार असेल, तर मी भाग २ मध्ये सहभागी होणार नाही, हे आदरपूर्वक स्पष्ट करतो."
त्याचे हे विधान मावरा होकेनच्या वक्तव्याच्या विरोधात होते. सोशल मीडियावर हर्षवर्धनच्या या भूमिकेला प्रचंड पाठिंबा मिळाला असून Redditसह अनेक प्लॅटफॉर्म्सवर त्याचे कौतुक करण्यात आले.
FWICE चा निर्णय
पश्चिम भारतीय चित्रपट कर्मचारी महासंघ (FWICE) या स्वयंसेवी संस्थेनेही भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या निर्णयास पाठिंबा दर्शवला आहे. हा निर्णय अधिकृत सरकारी आदेश नसला तरी, चित्रपटसृष्टीतील बहुतेक संघटनांनी त्याला मान्यता दिली आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.