रणवीर अल्लाहबादिया यांचं 'पाकिस्तानी भावंडां'वरील पोस्टनंतर स्पष्टीकरण – भारतीय लष्कराला सलाम करत नवा व्हिडिओ प्रसिद्ध!

    11-May-2025   
Total Views |
 
ranveer allahbadia clarification after post on pakistani brothers

 
मुंबई : प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया उर्फ Beer Biceps यांना अलीकडेच एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे मोठ्या प्रमाणावर टिकेचा सामना करावा लागला. या पोस्टमध्ये त्यांनी “पाकिस्तानी भावंडांनो” असं संबोधत शांतीचा संदेश दिला होता. मात्र त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटताच त्यांनी ती पोस्ट हटवली आणि नंतर भारतीय लष्कराला पाठिंबा दर्शवणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला.
 
 
नवीन व्हिडिओत रणवीर म्हणतात, “जय हिंद, जय भारत दोस्तों. भारतीय सैन्याला 100% प्रेम, पाठिंबा आणि सन्मान. गेल्या ५ वर्षांत आम्ही ५० पेक्षा अधिक मिलिटरी-थीम्ड पॉडकास्ट्स केले आहेत.”
 
 
त्यांनी स्पष्ट केलं की भारताची ‘हार्ड पॉवर’ ही सैन्य आणि सरकारकडे असते, पण ‘सॉफ्ट पॉवर’ ही सामान्य नागरिक आणि माध्यमांकडे असते. पुढे ते म्हणाले की, “पाहलगामवरील हल्ल्याच्या मागे पाकिस्तान आहे. हे सत्य आहे आणि हे सत्य जगभर पोहोचवणं हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा धर्म आहे.”
 
 
ते पुढे म्हणाले, “पाकिस्तान सैन्य आणि ISI, तुम्ही स्वतःच्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे आणि भारतातल्या दहशतवादालाही तुम्ही जबाबदार आहात. याचे पुरावे :
 
 
आतापर्यंत पकडले गेलेले सर्व दहशतवादी पाकिस्तानातूनच आलेले आहेत.
हाफिज अब्दूर रऊफच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानचे सैन्य अधिकारी उपस्थित होते.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी Sky News वर राज्यपुरस्कृत दहशतवादाची कबुली दिली.”
अशा ठाम भूमिका मांडल्यानंतरही नेटिझन्सनी रणवीरवर पुन्हा एकदा टीका केली. अनेकांनी त्याचं आधीचं 'पाकिस्तानी भावंडां'विषयीचं पोस्ट डिलीट केल्याबद्दल त्याला ट्रोल केलं. एका युजरने लिहिलं, “डिलीट का केली रे पोस्ट? तू तर 'इंशाअल्लाह' म्हणत होतास!”
 
 
यावर रणवीरने आणखी एक सविस्तर पोस्ट शेअर केली ज्यात त्यांनी “प्रत्येक भारतीयाने जाणून घ्याव्यात अशा ७ गोष्टी भारतीय सैन्याविषयी” नमूद केल्या. “आपल्या सैन्याला ही लढाई हवीच होती, हे एक रणनीतिक निर्णय आहे. त्यांच्या यशासाठी प्रार्थना करा,” असंही त्यांनी शेवटी लिहिलं.
 
 
या संपूर्ण प्रकरणात रणवीरने स्पष्ट केलं की त्यांचा रोष पाकिस्तानच्या नागरिकांवर नाही, तर पाकिस्तानच्या सैन्य आणि ISI यांच्यावर आहे. “भारतीय आणि पाकिस्तानी लोकांमध्ये द्वेष नाही, पण हे युद्ध आहे भारत विरुद्ध पाकिस्तानी लष्कर व ISI,” असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा ‘शांती’ हीच अंतिम आशा असल्याचं नमूद केलं – “इंशाअल्लाह!”
 
 
ही वादग्रस्त पोस्ट सध्या सोशल मीडियावरून हटवण्यात आली आहे.



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.