मुंबई: ( MHADA documents at one click ) ‘म्हाडा’चे स्कॅन केलेले सुमारे १५ कोटी कागदपत्रे (काही संवेदनशील कागदपत्रे वगळून) सार्वजनिक केले जाणार असून ‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळावर येत्या आठ दिवसांत अपलोड केली जाणार आहेत.
यामुळे ‘म्हाडा’शी संबंधित विविध माहिती आणि दस्तऐवज नागरिकांना अधिक सुलभतेने एका क्लिकवर केवळ बघण्यासाठी वर्गवारीनुसार उपलब्ध होणार आहेत. याद्वारे ‘म्हाडा’ पारदर्शक कारभाराच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पाऊल टाकत असल्याचे ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात आलेल्या ‘म्हाडा’ नागरिक सुविधा केंद्र, अभ्यांगत व्यवस्थापन प्रणाली, कार्यालय शोधक या सुविधा, ‘म्हाडा’चे नवीन-अद्ययावत संकेतस्थळ, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष यांचे उद्घाटन संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयस्वाल बोलत होते.
नागरिकांचे कार्यालयीन व्यवहार अधिक सोपे, सुलभ करण्याच्या उद्देशाने मुंबईतील ‘म्हाडा’ मुख्यालयात नागरिक सुविधा केंद्र, अभ्यांगत व्यवस्थापन प्रणाली, कार्यालय शोधक या सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या असून, ‘म्हाडा’चे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे. या माध्यमातून ‘म्हाडा’ कार्यालयीन प्रक्रियेतील पारदर्शकता वाढणार असून नागरिकांचा त्रास कमी होणार असल्याचे संजीव जयस्वाल यांनी सांगितले. १०० दिवस कृती कार्यक्रम आणि ‘एमएमआर ग्रोथ हब’ प्रकल्पातील योजनांना गती देण्यासाठी ‘म्हाडा’मध्ये प्रकल्प व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाच हजार सदनिकांची सोडत
जयस्वाल म्हणाले की, “वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासातील पुनर्वसन सदनिकांचा लवकरच लाभार्थ्यांना ताबा दिला जाणार आहे.“
“‘म्हाडा’ मुंबई मंडळातर्फे येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुमारे पाच हजार सदनिकांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. ‘म्हाडा’चे विक्री न झालेल्या सुमारे १९ हजार सदनिका विक्रीसाठी मोहीम राबविण्यात आली असून त्याद्वारे आतापर्यंत सुमारे ७ हजार, ५०० सदनिकांची विक्री झाली आहे,” असे जयस्वाल यांनी सांगितले.
‘म्हाडा’चे संकेतस्थळ अद्ययावत
१०० दिवसांच्या कृती कार्यक्रमानुसार ‘म्हाडा’चे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले असून सदर संकेतस्थळ वापरण्यास अधिक सुलभ करण्यात आले आहे. संकेतस्थळावरील सर्व माहितीचे अद्ययावतीकरण, सुरक्षितता, लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत सेवा अधिसूचित करून ऑनलाईन प्रसिद्ध करणे आदी बाबी करण्यात आलेल्या आहेत.