मुंबई : मनोरंजन विश्वातून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘द फॅमिली मॅन ३’ या बहुचर्चित वेबसीरिजमधून लोकप्रियतेच्या झोतात आलेल्या रोहित बसफोर या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी, २७ एप्रिल रोजी दुपारी गुवाहाटी जवळील एका धबधब्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.
अभिनेता रोहित बसफोर आपल्या काही मित्रांसोबत सहलीसाठी बाहेर पडला होता. पावसाळा नसतानाही निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवण्यासाठी त्यांचा हा प्लॅन होता. दुपारी १२.३० च्या सुमारास तो मित्रांसोबत निघाला, मात्र त्यानंतर अनेक तासांपर्यंत त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण फोन न लागल्याने आणि कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने चिंता वाढली. काही वेळाने त्याच्या मित्रांपैकी एकाने फोन करून ही धक्कादायक माहिती दिली – रोहित पाण्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
दुपारी २ वाजण्याच्या सुमारास रोहितचा मृतदेह धबधब्याजवळ आढळून आला. घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. पोलिसांकडून प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात वाटावा अशी शक्यता आहे, मात्र परिस्थिती पाहता मृत्यूला ‘संशयास्पद’ मानले जात आहे आणि अधिक तपास सुरू आहे.
रोहित काही महिन्यांपूर्वी मुंबईहून आपल्या गावी गुवाहाटीत आला होता. अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. 'द फॅमिली मॅन'सारख्या यशस्वी वेबसीरिजमध्ये काम मिळाल्यानंतर त्याच्या करिअरने एक नवे वळण घेतले होते. यानंतरही काही महत्त्वाच्या प्रोजेक्ट्ससाठी तो ऑडिशन्स देत होता आणि त्याला पुढच्या काळात बरीच संधी मिळण्याची शक्यता होती.
अचानक आलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे रोहितचे कुटुंबीय पूर्णतः हादरले आहेत. त्याचे चाहते, मित्र, सहकलाकार सगळेच त्याच्या जाण्याने दुःखात बुडाले आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या आठवणी शेअर करत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.