उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा पुन्हा धक्का! माजी महापौर दत्ता दळवी शिवसेनेत दाखल
29-Apr-2025
Total Views | 35
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. सोमवार, २८ एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आणि उबाठा गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
दत्ता दळवी यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर अखेर ते आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. याप्रसंगी मंत्री भरत गोगावले, खासदार संदिपान भुमरे, आमदार अशोक पाटील, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
यावेळी मुलुंड, भांडुप, विक्रोळी, ठाणे, रायगड,जळगाव येथील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये धारावी, विक्रोळी, कांजूर, भांडूप. मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, ५०० हून अधिक कार्यकर्ते, मुरबाडमधील उबाठा तालुकाप्रमुख, उप तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, युवासेना पदाधिकारी यांनी पक्षप्रवेश केला.
यासोबतच जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जवळपास दोन हजार कार्यकर्ते, सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील १८ सरपंच, छत्रपती संभाजी नगरमधील ओबीसी महासंघाचे २२ जिल्हाध्यक्ष, हिंदुस्थान चित्रपट कामगार सेना महासंघाचे पदाधिकारी तसेच .असंख्य ख्रिस्ती बांधवांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.