स्त्री-पुरुष समानतेचे खरे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’
29-Apr-2025
Total Views |
मुंबई (Women rights in constitution):“स्त्री-पुरुष समानतेचे खरे प्रणेते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे संविधानिक चौकटीत शक्य झाले आहे. बाबासाहेबांचे योगदान एका विशिष्ट समाजासाठी नव्हे, तर सर्वसमावेशक दृष्टिकोनातून झाले आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या सामाजिक न्याय, नगरविकास व परिवहनमंत्री ना. माधुरी मिसाळ यांनी केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (बार्टी), पुणे यांच्यावतीने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये महिलांना दिलेले अधिकार’ या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र सेवा संघ सभागृह, पंडित नेहरू मार्ग, मुलुंड (पश्चिम) येथे पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ना. माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून ‘बार्टी’चे महासंचालक सुनील बारे, निरीक्षक इंद्रिया आठावले, तसेच डॉ. माधवी नाईक, डॉ. मेघा किरीट सोमय्या आणि रश्मी जाधव उपस्थित होते. यावेळी माधुरी मिसाळ यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या तसेच ‘बार्टी’च्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात संयोजन समितीच्या योजना ठोकळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपच्या माजी नगरसेविका समिता कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रांती कुंदर यांनी केले. चर्चासत्रानंतर ‘मी रमाई’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले, ज्यात अभिनेत्री प्रियंका उगाळे यांनी प्रभावी अभिनय सादर केला.
‘बार्टी’ आणि महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार
“या कार्यक्रमासाठी ‘बार्टी’ आणि महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार, अशा लोककल्याणकारी उपक्रमांना शासनाने अधिकाधिक पाठबळ मिळावे, असे नम्र आवाहन करतो. परळ येथील डॉ. आंबेडकरांच्या निवासी वास्तुचे स्मारकात रूपांतर करण्याची प्रलंबित मागणी सरकारने या कार्यकाळात पूर्ण करावी, अशी माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत शासनाकडे मागणी करतो,” असे माजी मंत्री विजय (भाई) गिरकर म्हणाले.
महिलांच्या सबलीकरणासाठी ‘बार्टी’ कटिबद्ध
“संविधान अमृत महोत्सवात महिलांसाठी उपक्रम सुरू करताना, मुलुंड येथून याची खरी सुरुवात झाली आहे,” असे प्रतिपादन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’(बार्टी)चे महासंचालक सुनील वारे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या उपस्थितीबद्दल त्यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आभार मानले. “डॉ. बाबासाहेब आणि माता रमाई यांनी आपल्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत. त्यांची जाणीव ठेवून शिक्षण व समाजकार्यात सहभागी व्हावे, तसेच ‘बार्टी’च्या योजनांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.