"घरांची तोडफोड झाली नव्हती"; मुर्शिदाबाद हिंसाचारात हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांवर तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचा दावा

    21-Apr-2025   
Total Views |

tmc leaders in murshidabad deny reports of vandalism
 
कोलकाता : (Murshidabad Violence) मुर्शिदाबाद हिंसाचारादरम्यान इस्लामिक कट्टरपंथीयांच्या भीतीमुळे धुलियान आणि मुर्शिदाबादमधील शेकडो हिंदू कुटुंब घरे सोडून मालदा येथे पळून गेली होती., परंतु राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस हे स्वीकारण्यास तयार नाही. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार अमीरुल इस्लाम यांनी या हिंसाचारात हिंदू नागरिकांच्या घरांच्या तोडफोडीच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
 
अमीरुल इस्लाम हे मुर्शिदाबादच्या समशेरगंज भागातील आमदार आहेत. अमीरुल इस्लाम यांनी रविवार दि. २० एप्रिल रोजी हिंसाचारग्रस्त धुलियान आणि इतर भागांना भेट दिली. त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसचे इतर नेते होते. हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमधून पळून गेल्यानंतर, धुलियानहून मालदा येथील मदत छावणीत पळून गेलेल्या कुटुंबांना कडक सुरक्षेत परत आणण्यात आले. यावर भाष्य करताना अमीरुल इस्लाम म्हणाले, "या लोकांना परत आणण्यात आले नाही, ते स्वेच्छेने परतले आहेत. त्यांच्या घरांची तोडफोड करण्यात आली नव्हती, ते फक्त भीतीपोटी पळून गेले. आणि आता ते घरी परतत आहेत. आमचे शहर पुन्हा सामान्य स्थितीत परतत आहे. सात दिवस झाले आहेत आणि परिस्थिती शांत आहे. आमचा बंधुता कायम राहील," असे ते म्हणाले.
 
राज्यातील पोलिस यंत्रणा सध्या मुर्शिदाबादमध्ये पळून गेलेल्या हिंदूंना परत आणत आहेत. त्यांच्या परतीबाबत अमीरुल इस्लाम यांनी हे दावे केले आहेत. याआधीही, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. या हिंसाचारात प्रामुख्याने हिंदूंची घरे आणि दुकाने लक्ष्य करण्यात आली. यात तीन हिंदू नागरिकही मारले गेले. यानंतर, मुर्शिदाबादमधील मोठ्या संख्येने हिंदू मालदा आणि झारखंडमध्ये पळून गेले. त्यांनी मुर्शिदाबादमध्ये बीएसएफ आणि इतर केंद्रीय सुरक्षा दलांची कायमस्वरूपी तैनाती करण्याची मागणी केली होती.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\