छावा चा बॉक्स ऑफिसवर विजयी घोडदौड; तिसऱ्या आठवड्यात तब्बल ५०० कोटींच्या दिशेने आगेकूच!

    02-Mar-2025
Total Views |

Chhava Roars at the Box Office – Marching Towards the 500 Crore Club!”


मुंबई : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मोठी गर्दी खेचली असून, त्याची कमाई थांबायचे नाव घेत नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने १६व्या दिवशी २१ कोटींची कमाई करत एकूण देशांतर्गत कमाईचा आकडा ४३३.५० कोटींवर नेला आहे. आता छावा लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार, असे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या दिवसापासून छावा ची बॉक्स ऑफिसवर तूफान गर्जना!
पहिल्या आठवड्यात तब्बल २१९.२५ कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटींची भर घातली. प्रेक्षकांचा उत्साह पाहता, आगामी काही दिवसांत हा चित्रपट नव्या विक्रमांची नोंद करेल, असे संकेत मिळत आहेत.


भव्य स्टारकास्ट आणि दमदार अभिनय
या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून, त्याला रश्मिका मंदाना (येसूबाई), अक्षय खन्ना (औरंगजेब), आशुतोष राणा आणि दिव्या दत्त यांची साथ लाभली आहे. तसेच, अनेक मराठी कलाकारही या ऐतिहासिक चित्रपटाचा भाग आहेत. छावाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. चित्रपटाची लोकप्रियता पाहता, येत्या काही दिवसांत तो ५०० कोटींचा टप्पा सहज पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.