मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असतानाच आता त्याचे गाणेही आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत आहे. नुकताच अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर येथे ‘आया रे तुफान’ या गाण्यावर जबरदस्त डान्स सादर करण्यात आला. प्रसिद्ध डान्सर लॉरेन गॉटलीब आणि रोहित गिजारे यांच्या टीमने केलेला हा डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
टाइम्स स्क्वेअरवर भारतीय संस्कृतीचा जलवा!
कही आठवड्याभरात लॉरेन गॉटलीबने आपल्या समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला होता, त्या व्हिडीओला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ज्यामध्ये टाइम्स स्क्वेअरच्या पार्श्वभूमीवर २० डान्सर्सनी ‘आया रे तुफान’ गाण्यावर एनर्जेटिक परफॉर्मन्स दिला. ए. आर. रहमानच्या दमदार संगीताने सजलेले हे गाणे आधीच लोकप्रिय झाले असून, आता हा डान्स परफॉर्मन्स पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.
व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग
हा व्हिडीओ पोस्ट झाल्यापासूनच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २.९ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, २ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच, ४ हजारांहून अधिक जणांनी यावर जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव अश्या प्रतिक्रिया देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
'छावा' चित्रपटाची दमदार यशोगाथा
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्स निर्मित छावा चित्रपटाने भारतात ४०० कोटींचा टप्पा पार केला असून, जागतिक स्तरावर ६०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. विकी कौशलसह रश्मिका मंदाना, दिव्या दत्त, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाने हा चित्रपट अधिकच भक्कम झाला आहे. टाइम्स स्क्वेअरवरील या परफॉर्मन्समुळे छावा चित्रपटाची लोकप्रियता आणखी वाढली असून, जागतिक स्तरावरही त्याच्या प्रभावाची चर्चा रंगू लागली आहे!