मराठी चित्रपटसृष्टी सध्या अनेकविध आव्हाने व स्थित्यंतरांतून मार्गक्रमण करीत आहे. एकीकडे नव्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद काहीसा संमिश्र असताना, अजूनही काही जुने चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतात. अशा या जुन्या चित्रपटांच्या हृदयस्पर्शी संवादांपासून ते थेट मनाला भिडणार्या गीतांपर्यंत, सर्व काही आजही जसेच्या तसे प्रेक्षकांच्या स्मृतिपटलावर कोरलेले आहे. त्यामुळे जुन्या मराठी चित्रपटांची जादू आजही टिकून आहेच. हे लक्षात घेता, मराठी चित्रपटसृष्टीच्या भविष्यासाठी नावीन्याची कास धरण्याबरोबरच, जुन्याचाही मेळ साधण्याचा प्रयोग कितपत यशस्वी ठरु शकतो? ज्येष्ठ कलाकार नेमके या प्रयोगाकडे कसे बघतात? याविषयीचा केलेला हा ऊहापोह...
वर्तमानात मराठी चित्रपटसृष्टीसमोर काही आव्हाने ही अगदी आ वासून उभी आहेत, असे म्हटले तर वावगे ठरु नये. यामध्ये प्रामुख्याने कथानकांतील नावीन्याचा अभाव, संकलन, दिग्दर्शन आणि तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर, अल्प बजेटमुळे तांत्रिकदृष्ट्या कमकुवत निर्मिती, अभिनयातील सातत्याचा अभाव, चित्रपटांचे मार्केटिंग, जाहिरातबाजीतील त्रुटी, मल्टिप्लेक्समध्ये स्क्रीन उपलब्ध न होणे, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांशी दिवसेंदिवस वाढणारी स्पर्धा, अशा विविध समस्यांच्या गर्तेत मराठी चित्रपटसृष्टी रुतलेली दिसते.
कर्मणा एव हि संसारस्य कारणम्।
न हि वचनेन मुक्तिः।
कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही आणि केवळ बोलण्याने काही बदल घडत नाही, असा याचा साधा अर्थ. मराठी चित्रपटसृष्टीची अवस्थाही काहीशी अशीच. आजवर मराठी चित्रपटसृष्टीलाही जीवनदान देण्याकरिता अनेकांनी मते मांडली. सूचनाही सूचविल्या. पण, मग या समस्यांवर तोडगा काय? यासंबंधी काही हालचाली सुरू आहेत का? असे काही प्रश्न अनुत्तरितच.
बरेचदा वर्तमानातील समस्या आणि भविष्यातील समाधान हे भूतकाळात शोधले की सापडते, असे म्हणतात मराठी चित्रपटसृष्टीच्या बाबतीतही हा नियम काहीसा लागू व्हावा. कारण, आजच्या आधुनिक काळातही जुन्या मराठी चित्रपटांचा प्रेक्षकांच्या मनावरील प्रभाव कायम आहे. काही चित्रपट तर इतके लोकप्रिय आहेत की, समाजमाध्यमांवर त्यांचे संवाद, गाणी आणि प्रसंग आजही मोठ्या प्रमाणात वारंवार व्हायरल होत असतात. यांपैकी काही अमर चित्रपटांची आठवण अधोरेखितस करावीशी वाटते. ’गंमत जंमत’ (१९८७) या चित्रपटातील मजेशीर गोष्टी आणि उत्तम अभिनय अजूनही प्रेक्षकांना गुदगुदली करुन जातो. ’अशी ही बनवाबनवी’ (१९८८) हा आजही मराठीतील विनोदी चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थान पटकावणारा सिनेमा. ’थरथराट’ (१९८१) हा अॅक्शन आणि सामाजिक आशयाची उत्तम सांगड घालणारा चित्रपट, तर ’माहेरची साडी’ (१९९१) हा कौटुंबिक भावनांचा ठसा उमटवणारा चित्रपट. ’झपाटलेला’ (१९९३) भय आणि थरार यांचा सुरेख मिलाप असलेला चित्रपट.
’सिंहासन’ हा १९८९ साली राजकारणावर भाष्य करणारा चित्रपट आजही तितकाच प्रासंगिक वाटतो. ’पिंजरा’ (१९७२) हा तमाशा कलावंतांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा कालातीत चित्रपट म्हणावा लागेल. ’दुनियादारी’ (२०१३) महाविद्यालयीन जीवनावर आधारित आजच्या पिढीच्या मनाला भावलेला चित्रपट. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात अजूनही घरोबा करणारे हे चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले, तर सिनेसृष्टीसाठीही एक सकारात्मक बाब म्हणता येईल. अशा चित्रपटांशी जोडलेल्या जुन्या रम्य आठवणी आणि आपल्या लाडक्या कलाकारांचा अभिनयाविष्कार पुनश्च अनुभवण्यासाठी प्रेक्षकांची पाऊले नक्कीच चित्रपटगृहांकडे वळतील, यात तीळमात्र शंका नाही. मराठी प्रेक्षकांची केवळ जुनी पिढीच नाही, तर नव्या पिढीलाही हे चित्रपट भावतील, असाही एक विश्वास वाटतो. जुन्या चित्रपटांचे मोठ्या पडद्यावर असे भव्यदिव्य पुनरागमन झाले, तर मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. तसेच चित्रपटगृह मालकांना आणि निर्मात्यांनाही आर्थिक उत्पन्नामुळे ‘अच्छे दिन’ येतील.
हा प्रयोग यशस्वी होईल अथवा नाही, या विवंचनेत कुणी असेल तर हिंदी चित्रपटसृष्टीचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवता येईल. हिंदी चित्रपटसृष्टीने यशस्वीपणे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘शोले,’, ’गदर’ यांसारखे बरेचसे चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करून प्रेक्षकांचा प्रतिसाद तर मिळवलाच, शिवाय मोठा गल्लाही जमवला. हिंदीतील हा ट्रेंड लक्षात घेता, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘माहेरची साडी’, ‘सिंहासन’ यांसारखे सदाबहार चित्रपट नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मग मराठी सिनेसृष्टीने हा प्रयोग का करू नये?
आजच्या झपाट्याने बदलणार्या आणि झटपट रिलच्या जमान्यात, ओटीटी प्लॅटफॉर्मवर यांपैकी काही जुने चित्रपट पाहण्याऐवजी मोठ्या पडद्यावरही त्यांचा एक वेगळाच आनंद घेता येऊ शकतो, असा विचार का करू नये? जुन्या चित्रपटांमधील आशयनिर्मितीची ताकद लक्षात घेता, मराठी चित्रपटसृष्टीने या दिशेने पाऊल उचलणे तितकेच गरजेचे आहे. हा प्रयोग यशस्वी झाला, तर निश्चितच मराठी चित्रपटांना मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग मिळू शकतो.
दाक्षिणात्य चित्रपटांत त्यांची भाषा, संस्कृती यांचे प्रतिबिंब प्रकर्षाने उमटताना दिसते. याबाबतीत मराठी चित्रपटसृष्टी कुठे कमी पडते, अशातला भाग नाही, पण याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, हे मात्र खरे. तसेच तर ‘व्ही.एफ.एक्स.’चे तंत्रही मराठी चित्रपटांना आत्मसात करावे लागेल. पण, ‘व्ही.एफ.एक्स’ म्हणजेच यशस्वी चित्रपट असेही नाही. कारण, जर असे असेल, तर जुन्या मराठी चित्रपटांत ‘व्ही.एफ.एक्स.’ हा प्रकार फारसा हाताळला जायचा नाही, तरी असे कित्येक मराठी चित्रपट आहेत, जे तरुण पिढी आजही समाजमाध्यमांवर शोधत असते.
आजवरचा अनुभव लक्षात घेता, वेगवेगळे प्रयोग करण्यात मराठी चित्रपटसृष्टीही मागे नाहीच. मग असाच हा ‘जुने ते सोने’चा प्रयोग करुन मराठी चित्रपट खजिन्याचा पेटारा पुन्हा उघडून प्रदर्शित करता आला तर... तर मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा आपले स्थान निर्माण करायला वेळ लागणार नाही, असे वाटते.
आज आपण पाहतो की, हिंदी चित्रपटसृष्टीतील सिनेमे चालावे, याकरिता काही प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जातात आणि तो चित्रपट पाहायला प्रेक्षकवर्गही गर्दी करतो. याचे एकमेव कारण म्हणजे, प्रत्येक चित्रपटासह प्रेक्षकवर्गाची एक आठवण जोडलेली असते. एखादी व्यक्तिरेखा, एखादा प्रसंग, एखादी कथा, एखादा चित्रपट त्यामुळे बरेच लोक त्याच आठवणी जागवण्यासाठी चित्रपटगृहात वळतात. हे सांगण्यामागचे कारण, मराठी चित्रपटसृष्टीत एकदा का जुना माहोल, जुन्या आठवणी पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केल्या, तर ते पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी जुना आणि आजचा तरुणवर्ग नक्कीच गर्दी करेल.
या प्रयोगातून मराठी चित्रपटगृहांना मराठी चित्रपटांना, मराठी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवता येईल, हे मात्र नक्की!
...तर मराठी चित्रपटसृष्टी निश्चितच उंच भरारी घेईल!
मराठी चित्रपटसृष्टीत जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन असा प्रयोग नक्कीच व्हायला हवा. पण, मला असे कुठेच वाटत नाही की, मराठी चित्रपटसृष्टी कुठे कमी पडते. तरीही असे प्रयोग झाले पाहिजे. यामुळे मराठी चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांच्या मनात एक गोडी निर्माण होईल. खरे सांगायचे झाले, तर मध्यंतरीच्या काळात मराठी चित्रपट फारसे चालत नव्हते. पण, आताचे नवीन चित्रपट एक नवी उभारी घेताना दिसतात. उदा. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने एक ‘रेकॉर्ड’ निर्माण केला. असे एक एक नवीन चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. याचे कारण म्हणजे, या चित्रपटांचा विषय वेगळा होता. असेच वेगवेगळे आशय येत राहिले, तर मराठी चित्रपटसृष्टी निश्चितच उंच भरारी घेईल. बर्याचदा एकच आशय इतर चित्रपटांमध्ये सातत्याने दाखवला गेला की प्रेक्षकवर्गही कंटाळतो. त्यामुळे ही गोष्ट टाळून नवीन विषय हाताळले गेले, तर मराठी प्रेक्षकवर्गाचे पाय मराठी चित्रपट पाहण्यासाठी वळतील, हे मात्र नक्की!
- किशोरी अंबिये, ज्येष्ठ अभिनेत्री
जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले तर चित्रपटसृष्टीला आधार
जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा प्रयोग केला गेला पाहिजे. पूर्वी वर्षातून एकदा दादा कोंडके यांचे चित्रपट प्रदर्शित व्हायचे. ते पाहण्यासाठी प्रेक्षकही मोठ्या संख्येने चित्रपटगृहात दाखल व्हायचे. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’ अशा चित्रपटांची ‘पब्लिसिटी’ करून ते पुन्हा प्रदर्शित करता येऊ शकतात. पण, तरीही काही प्रश्न उभे राहतात. जसे की, हे चित्रपट दाखवणार कुठे? मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी हक्काची जागा कुठे आहे? नवीन मराठी चित्रपटांना ‘मल्टिप्लेक्स’मध्येसुद्धा जागा मिळत नाही, तर अशा ठिकाणी जुने चित्रपट कोण लावणार? ही झाली डावी बाजू. पण, खरेच असे बरेच उत्तम चित्रपट आहेत, जे पुन्हा प्रदर्शित करायला काहीच हरकत नाही. ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट पूर्वी टीव्हीवर दाखवला जायचा. आता तोही बंद झाला. तो चित्रपट जर पुन्हा प्रदर्शित केला गेला, तर पहिले मी जाईन तो पाहायला. तर अशा काही चांगल्या चित्रपटांची यादी काढून ते पुन्हा प्रदर्शित केले गेले, तर नक्कीच चित्रपटसृष्टीला आधार मिळू शकेल, असे मला वाटते.
- विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेते
अनिरुद्ध गांधी