ऐतिहासिक क्षण ! मेट्रो ३ची ट्रेन ‘कफ परेड’ स्थानकात दाखल

जुलै २०२५ पर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित करण्याचा एमएमआरसीएलचा निर्धार

    01-Mar-2025
Total Views | 45

Trial train arrives at Cuffe Parade, the farthest station of aqualine


मुंबई,दि.२९ : विशेष प्रतिनिधी 
मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मुंबई मेट्रो ३ने ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ‘ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-३ च्या ट्रेनने शुक्रवार, दि.२८ रोजी कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामुळे मुंबईकरांसाठी आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठी समस्या लवकरच सुटणार आहे. २५जुलैपर्यंत संपूर्ण मार्गिका आणि आचार्य अत्रे ते कफ परेड हा मेट्रोमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरू होण्याच्या दिशेने हा महत्वाचा दिवस आहे.

ॲक्वा लाईनच्या एकूण ३३.५ किमी लांबीच्या मार्गातील १२.६९ किमीचा पहिला टप्पा आरे-जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ७ ऑक्टोबर २०२४ पासून प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या धारावी ते आचार्य अत्रे चौक हा दुसरा टप्पाचा ९.७७ किमीचा भाग वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने जात असून या स्थानकादरम्यान नियमित चाचण्या सुरू आहेत. हा टप्पा सात महत्त्वाच्या स्टेशनला जोडणार आहे. दरम्यान, शुक्रवार, दि.२८ रोजी झालेल्या यशस्वी चाचणीमुळे १०.९९ किमी लांबीच्या टप्पा २ बी आचार्य अत्रे चौक ते कफ परेडच्या उभारणीस गती मिळाली आहे. ओव्हरहेड कॅटेनेरी सिस्टम (OCS) आणि ट्रॅक बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, आता उर्वरित प्रणाली म्हणजेच आर्किटेक्चरल फिनिशिंग आणि रस्ते पुनर्बांधणीची कामे प्रगतीपथावर आहे.


मुंबईच्या वाहतुकीला नवीन गती

आजच्या यशस्वी चाचणीमुळे मेट्रो-३ च्या कार्यान्वयनाला गती मिळणार आहे. मेट्रो ३ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर पश्चिम उपनगर, बीकेसी आणि दक्षिण मुंबई यांना जलद आणि पर्यावरणपूरक दळणवळण सुविधा मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा अनुभव सुखद होणार असून हा प्रकल्प त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होईल.

"धारावी ते आचार्य अत्रे चौक या टप्प्याच्या चाचण्या वेगाने सुरू असून आता आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या टप्प्यात देखील मेट्रो गाडी पोहोचली आहे. जुलै २०२५ पर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित करण्याचा आमचा निर्धार आहे."

- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, एमएमआरसी

"मुंबईकरांना उत्कृष्ट आणि सक्षम वाहतूक सेवा देण्याच्या उद्देशाने अखेरच्या टप्प्यातील कामे जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. यशस्वी चाचण्या आमच्या प्रगतीचा स्पष्ट पुरावा आहेत. लवकरच ॲक्वा लाईनद्वारे मुंबईकरांना जागतिक दर्जाची सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळणार आहे."
- एस. के. गुप्ता,संचालक (प्रकल्प), एमएमआरसी
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121